निवडणुकांची चर्चा रंगलेली असताना भाजपाने होती घेतलं 'गाव चलो' अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 02:41 PM2024-02-02T14:41:36+5:302024-02-02T14:42:09+5:30

फडणवीस, गडकरींसह सर्व बडे नेते होणार सहभागी

BJP launch Gaon Chalo Abhiyan as various leaders to stay in various villages | निवडणुकांची चर्चा रंगलेली असताना भाजपाने होती घेतलं 'गाव चलो' अभियान

निवडणुकांची चर्चा रंगलेली असताना भाजपाने होती घेतलं 'गाव चलो' अभियान

BJP Gaon Chalo Abhiyaan : यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेची निवडणूक लागण्याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. तशातच आज भाजपाकडून एका नव्या अभियानाची घोषणा करण्यात आली. हे अभियान नक्की काय आणि त्यातून नक्की काय केले जाणार आहे, याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. भाजपातर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' राबविण्यात येणार आहे. भाजपा मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळेंनी ही माहिती दिली.

सर्व मंत्री नेमून दिलेल्या गावात राहणार

या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आपण स्वतः अमरावती जिल्ह्यातील साऊर येथे एक दिवस राहणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणा-या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजीं ची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात य़ेणार आहेत.

कोणत्या नेत्याला कोणते गाव?

पुढे त्यांनी सांगितले की,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा येथे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा ( ता. कळमेश्वर ) मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार हे गुरामवाडी (ता. मालवण), रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे एक दिवस मुक्कामास जाणार आहेत. पीयूष गोयल, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील हे केंद्रीय मंत्रीही या अभियानात सहभागी होणार आहेत. शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विलेपार्ले येथे या अभियानात सहभागी होणार आहेत.

या अंतर्गत 50 हजार युनिट्समध्ये भाजपा चे 50 हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी राज्यभरातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना 32 हजार सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल. प्रत्येक युनिटमध्ये भाजपा चा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे करेल. 50 हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने युवकांसाठी ‘नमो चषक’ तसेच महिलांसाठी ‘शक्ति वंदन कार्यक्रम’ देखील राबवण्यात येत आहे. लवकरच पंतप्रधान मोदी हे शक्तिवंदन कार्यक्रमाद्वारे महिला बचत गट प्रतिनिधींशी संवाद साधणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

Read in English

Web Title: BJP launch Gaon Chalo Abhiyan as various leaders to stay in various villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.