राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपाने लावला सुरुंग!
By Admin | Published: November 11, 2016 02:15 AM2016-11-11T02:15:42+5:302016-11-11T02:15:42+5:30
बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राजकीय सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे
बारामती : बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राजकीय सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्यासह संचालकांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
बारामती शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोककाका देशमुख, प्रशांतनाना सातव यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या बारामती दौऱ्यातच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव अण्णा तावरे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्यासह १४ संचालक, तसेच माजी जि.प. सदस्य प्रमोद काकडे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे ३ विश्वस्तांनी भाजपामध्ये प्रवेश केला. बारामती नगरपालिकेच्या राजकारणात मागील तीन पिढ्या सहभागी असलेल्या सातव कुटुंबातील माजी विक्रीकर अधिकारी प्रशांत नाना सातव, ज्येष्ठ नेते अशोक काका देशमुख, माजी नगरसेवक सतीश फाळके, हेमंत नवसारे, धैर्यशील तावरे लाखे, शशिकांत तावरे, छावा संघटनेचे बाळासाहेब पाटील आदींनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक म्हणून सातव कुटुंब ओळखले जाते.