भाजपाकडून मोदी विजयासाठी महिला आघाडीचे अस्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:32 AM2019-01-31T11:32:07+5:302019-01-31T11:39:52+5:30

केंद्र आणि राज्य सरकारने साडेचार वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचण्यासाठी संपूर्ण देशभरात कमल शक्ती मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे.

BJP launches women's power for modi victory | भाजपाकडून मोदी विजयासाठी महिला आघाडीचे अस्त्र

भाजपाकडून मोदी विजयासाठी महिला आघाडीचे अस्त्र

Next
ठळक मुद्देभाजप राष्ट्रीय पदाधिकारी बैठकीमध्ये निवडणुकीत महिला कशा पद्धतीने काम करतील हे निश्चित सोशल मीडियाचा करणार प्रभावशाली वापर

पुणे  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2019 मध्ये पुन:श्च विजयी करण्यासाठी भाजपाकडूनमहिला आघाडीचे अस्त्र वापरले जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने साडेचार वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचण्यासाठी संपूर्ण देशभरात कमल शक्ती मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. 
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चाच्या  राष्ट्रीय पदाधिका-यांची बैठक बुधवारी (ता. ३०) महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानिमित्त विजया रहाटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. 
 केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या साडेचार वर्षात राबवलेल्या अनेक लोक कल्याणकारी योजनांना लाखो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आणि विविध सामाजिक घटकांशी जोडून घेण्याचे उद्दीष्ट भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने निश्चित केले आहे. या दृष्टीने देशभर कमल शक्ती मोहिम  राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विजया रहाटकर यांनी दिली. कमल शक्ती मोहिमेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला केंद्रीत सामाजिक संघटना, महिला बचत गट, नोकरदार महिला, शिक्षक-वकील-डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील महिलांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. भाजप राष्ट्रीय पदाधिकारी बैठकीमध्ये निवडणुकीत महिला कशा पद्धतीने काम करतील हे निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या नीती लोकासमोर नेण्याची रणनीती ठरली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिक्षण, संशोधन, कला, साहित्य आदी विविध क्षेत्रातल्या प्रज्ञावंत महिलांचे संमेलन घेतले जाईल. समाजमन घडविणा-या महिला वकील, डॉक्टर, उद्योजिका, प्राचार्या-शिक्षिका आदींशी संवादात्मक कार्यक्रम होणार असून, यात पक्षाचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते सहभागी होणार असल्याचे रहाटकर यांनी सांगितले. 
त्यानुसार पाच बूथचे एक शक्तिकेंद्र स्थापन करण्यात आले असून, केंद्रामध्ये विविध गटांमधील महिलांचा अधिकतर  समावेश करण्यात आला आहे. केंद्रप्रमुख सहाय्यक म्हणून महिला जबाबदारी पार पाडणार आहेत. त्या केंद्रांवर प्रमुखांची यादी आहे त्यात अधिक महिला आहेत. पुण्यात 80 टक्के यादी पूर्ण झाली असल्याची माहिती योगेश गोगावले यांनी दिली. निवडणुकीत भाजपाकडून महिलांना उमेदवारी देण्यासंबंधी महिला आघाडी प्रस्ताव पाठवणार का? याविषयी विचारले असता रहाटकर म्हणाल्या, महिलांच्या उमेदवारीसंदभार्तील प्रस्ताव महिला आघाडी देऊ शकत नाही. पण भाजप निवडणुकीत महिला आरक्षण देण्याच्या  बाजूने आहे. देशात सर्वात जास्त खासदार आणि आमदार भाजपाच्याच आहेत. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती नक्कीच होईल. महिलांना उमेदवारी देण्यासंदर्भातला निर्णय सर्वस्वी पक्षाचा आहे. 
    कॉंग्रेसने प्रियंका गांधी यांना निवडणुकीचा चेहरा म्हणून समोर केल्यानंतर त्यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी करण्यात आली, याकडे रहाटकर यांचे लक्ष वेधण्यात आले त्यावर एखाद्या महिलेवर टीका करणे योग्य नाही. ज्या  पक्षातून प्रियंका आल्यात त्या पक्षाचे नेते पण त्यांच्या नेतृत्वाकडे  कसे पाहातात हे बघणे गरजेचे आहे. त्यांनीही प्रियांकाला सन्मान द्यायला हवा, कुणीही महिलांविषयी अवमानकारक उदगार काढू नयेत अशी स्पष्टोक्त्ती रहाटकर यांनी दिली. 
..............
सोशल मीडियाचा करणार प्रभावशाली वापर
लोकांशी अधिकाधिक संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम बनले आहे. त्यामुळे  सोशल मीडियायामध्ये महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सक्रीय होणार आहेत. त्या दृष्टीने शेकडो महिलांचे व्हॉट्स ग्रुप तयार करुन त्या द्वारे सरकारची कामगिरी, लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत आम्ही घेऊन जाणार असल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले.

Web Title: BJP launches women's power for modi victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.