Devendra Fadnavis On MVA Maha Morcha: “मविआचा महामोर्चा राजकीय, संतांना अपशब्द बोलणारे मोर्चे काढतात”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 03:10 PM2022-12-17T15:10:37+5:302022-12-17T15:11:10+5:30
Maharashtra News: तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे हा नॅनो मोर्चा होता, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Devendra Fadnavis On MVA Maha Morcha: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. या मोर्चाविरोधात भाजपने माफी मांगो मोर्चा काढला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामोर्चावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले.
महाविकास आघाडीच्या या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी झाले. यात शिवसेनेकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते सहभागी झाले होते. याशिवाय काँग्रेसच्या वतीने नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते सहभागी झाले होते. या मोर्चाला संबोधित करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
मविआचा महामोर्चा राजकीय मोर्चा
महाविकास आघाडीचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे. जे संतांना शिव्या देतात, ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही, ते मोर्चा काढतात. दररोज सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती. राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही, त्यांच्या नाकाच्या खालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो. त्यामुळे हे सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेत येऊ. तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो, तसा हा मोर्चा नॅनो होता. उद्धव ठाकरे यांची कॅसेट तशीच होती जी बदलली नाही. त्यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नाही, अशा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, सीमाप्रश्नाचा वाद आजचा नाही. गेली साठ वर्षे हा वाद सुरू आहे. सीमा प्रश्नाला काँग्रेस जबाबदार आहे, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"