पवारसाहेब...महाराष्ट्र हे जाणतोय आणि पाहतोय; MPSC आंदोलनावरून भाजप नेत्याचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 03:01 PM2024-08-22T15:01:19+5:302024-08-22T15:13:45+5:30
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.
MPSC Exam Date ( Marathi News ) : स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५ ऑगस्ट रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा पुढे ढकलण्यासह अन्य काही मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून विद्यार्थी पुण्यातील शास्त्रीनगर इथं आंदोलन करत होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. याच आंदोलनावरून आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
"विद्यार्थी हितासाठी आपण स्वतः तातडीने MPSCशी बोलला असतात तरी चालू शकले असते. पण तसे न करता आंदोलनात सहभागी व्हायचा इशारा आपण दिलात. महाराष्ट्र हे जाणतोय आणि पाहतोय," असं म्हणत आशिष शेलार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
शेलारांचा हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांच्यावर टीका करताना आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, "मा. शरद पवार साहेब...काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करुन विद्यार्थ्यांचे तारखेबाबतचे म्हणणे MPSC च्या लक्षात आणू दिले होते. नुकताच तारीख बदलण्याचा निर्णय घोषित झालाही आहे. पण...MPSC ही संस्था स्वायत्त आहे, हे आपल्याला माहीत नसावे असे होणार नाहीच. परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारणच करायचे हे तुम्ही ठरवलेले दिसतेय. त्यामुळे आपल्याकडून आयत्या पिठावर रेगोट्या मारायला सुरूवात केली गेली," अशा शब्दांत शेलार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
मा. शरद पवार साहेब
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 22, 2024
काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करुन विद्यार्थ्यांचे तारखेबाबतचे म्हणणे MPSC च्या लक्षात आणू दिले होते. नुकताच तारीख बदलण्याचा निर्णय घोषित झाला ही आहे.
पण...
MPSC ही संस्था स्वायत्त आहे, हे आपल्याला माहित नसावे असे होणार नाहीच.…
शरद पवारांनी सरकारला काय इशारा दिला होता?
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शरद पवार यांनी काल रात्री राज्य सरकारला इशारा दिला होता. "पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार," असं पवार यांनी म्हटलं होतं.