"शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे"; आशिष शेलारांची टीका
By देवेश फडके | Published: February 4, 2021 02:00 PM2021-02-04T14:00:32+5:302021-02-04T14:04:23+5:30
महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
मुंबई : शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. अमिबाला सुद्धा लाज वाटावी, अशाप्रकारे एकाच वेळी चार पद्धतीने चालणारा शिवसेना पक्ष आहे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप करत शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे, याचा अर्थ यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. भाजपने मागणी लावून धरल्यानंतर अटक करण्यासाठी कारवाई केली जात आहे. मूळात परिषदेला परवानगीच का दिली?, अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली.
"बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय", संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले
महाविकास आघाडी सरकारची शरजीलला मदत?
शरजील उस्मानीने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जाऊ का दिले? शरजीलला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केले आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन करत मागणी लावून धरल्यानंतर गुन्हा दाखल करू, असे म्हणणे ही पश्चात्तापबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूंना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे काम का केले, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.
शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा
नागपूरच्या कार्यालयात आपण वारंवार भेटला आहात, आताही जावे. शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा. भाजपाला बाजूला ठेवण्याच्या हेतूने स्वत:च पर्याय म्हणून दुसऱ्यांच्या कुबड्या घेतात. आपल्या विचारधारेला तिलांजली देतात. देशातील जनतेच्या मानसिकतेच्या मतांवर भाष्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सूर्यावर थुंकण्याचे प्रयोग करू नयेत, असे आशिष शेलार म्हणाले.
तेव्हा महाराष्ट्रद्रोह आठवतो आणि आता?
महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली, तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण मग आता परदेशातून कोणी आपल्या देशाच्या विषयावर टीका, बदनामी केली, तर यांना आनंद होतोय. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावे, अशीही मागणी आशिष शेलार यांनी यावेळी केली.