“शिल्लक राहिलेल्या कावळ्यांची 'पंगत' तरी भविष्यात टिको,” शेलारांचा ठाकरे गटाला जोरदार टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:23 PM2023-05-26T12:23:39+5:302023-05-26T12:24:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. परंतु सामनाच्या संपादकीयमधून यावर निशाणा साधण्यात आला होता.
रविवार २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. परंतु यापूर्वीच यावरून वाद सुरू आहे. काही पक्षांनी संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. आता यावरून शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं निशाणा साधलाय.‘निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याचे नाव असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती, पण आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही, आलात तर अपमान करू, असा स्पष्ट संदेश सरकारने दिलाय,’ असं म्हणत सामनाच्या संपादकीयमधून हल्लाबोल केलाय. आता यावरून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला आहे.
“वास्को द गामा जग प्रवासाला निघाला तेव्हा आजचे बोरु बहाद्दर संजय असते तर त्या वास्को द गामाला पण प्रभादेवीच्या गल्लीत बसून शहाणपण शिकवायला हे गेले असते किंवा त्याने बोटीला बांधलेल्या शिडाचा रंग कुठला असावा यावर निषेध पत्रक काढत बसले असते. कारण हे फक्त उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे आहेत. केवळ दुसऱ्याच्या घरातून फेकलेल्या पंगतीवरच्या पत्रावळीवरचे कावळे उपजीविका करतात,” असं म्हणत आशिष शेलारांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकेचा बाण सोडला.
जनता सुजाण, ती ऐकतेय
आनंदाच्या क्षणी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले. पण औचित्य भंग करायचा असे ठरलेच होते, अशा कावळ्यांचा बहिष्काराचा कर्णकर्शक आवाज सुरु झाला. देशातील जनता हे ऐकतेय. जनता सुजाण आहे. ती निर्मितीच्या बाजूनेच उभी राहील. ती उद्ध्वस्तांच्या माकडचाळ्यांना फारसे स्थान देणार नाही, असा विश्वासही शेलारांनी व्यक्त केला.
हे तर उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे!@rautsanjay61@OfficeofUT@BJP4Mumbai@BJP4India#NewParliamentBuildingpic.twitter.com/iffAkJmVSo
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 26, 2023
हा आदर बेगडी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल आज एवढा आदर व्यक्त करणारे त्यांना राष्ट्रपती होताना विरोध करीत होते. त्यामुळे हा आदर बेगडी आहे. संसदेचा हा सोहळा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंती दिनी २८ मे ला होतोय. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना भारतमातेच्या महान सुपुत्राला अशा प्रकारे पंतप्रधान अभिवादन करणार, त्या क्षणी सगळ्यांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. पण काँग्रेसच्या सावरकरद्वेषाला खतपाणी घालून "उबाठा" ने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे ‘उबाठा’चा हा सावरकरद्रोह आणि महाराष्ट्रद्रोह आहे याची नोंद इतिहास घेणारच, असंही त्यांनी नमूद केलं.
आम्हाला सामनातून अग्रलेख लिहून शहाणपणा शिकवणाऱ्यांनी एका ऐतिहासिक क्षणी तुम्ही उष्ट्या पत्रावळ्या चाटत बसा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा! शेवटी ज्याची जेवढी कुवत तेवढीच उंचीची पायरी त्याला मिळते. शिल्लक राहिलेली कावळ्यांची ‘पंगत’ तरी भविष्यात टिको एवढीच आमची प्रार्थना असल्याचे शेलार म्हणाले.