Maharashtra Political Crisis: खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:16 AM2022-08-01T11:16:13+5:302022-08-01T11:17:45+5:30
Maharashtra Political Crisis: ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाईसंदर्भात भाजपने शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पण का? जाणून घ्या...
मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. मात्र, यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना भाजपकडून खोचक टोला लगावण्यात आला आहे.
शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी अभूतपूर्व केलेल्या बंडानंतर पक्षाला घरघर लागल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भगदाडाला ढिगळं जोडून पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड सक्रीय झाले आहेत. ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याच्या दौऱ्यावर असणार आहे. मात्र, बहुतांश बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत, शरद पवारांशी सलगी करत महाविकास आघाडी स्थापन केल्यामुळेच शिवसेनेत नाराजी होती, असंतोष होता, असे म्हटले. तसेच भाजपनेही शरद पवार आणि संजय राऊतांच्या दिलजमाईवर अनेकदा टीका केली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या ईडी कारवाईनंतर संजय राऊतांना अटक करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.
खाकस्पर्श...!
संजय राऊतांवर झालेल्या ईडी कारवाईनंतर अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक इमेज शेअर केली आहे. यामध्ये तीन फोटो असून, पहिल्या फोटोत माजी गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवारांचा हात धरून त्यांना कार्यक्रमास्थळी नेत असल्याचे दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हे शरद पवारांसोबत उभे असल्याचे दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत संजय राऊत आणि शरद पवार एकत्र असल्याचे दिसत आहेत. या फोटोला अतुल भातखळकर यांनी ‘खाकस्पर्श...’ असे कॅप्शन दिले आहे. म्हणजेच ज्यांनी ज्यांनी शरद पवारांचा हात धरला, त्यांचे पुढे काय झाले, हे अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या उदाहरणांवरून सांगण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ईडी कार्यालयात घेऊन जाताना संजय राऊतांनी आपल्या अनोख्या शैलीत निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले. घरातून बाहेर पडल्यानंतर गळ्यातील भगवा गमछा काढून त्यांनी हवेत फिरवला. तसेच कारच्या सनरुफमधून बाहेर येऊन शिवसैनिक आणि समर्थकांना हात दाखवून आणि पुन्हा गळ्यातील भगवा गमछा फिरवून अभिवादन केले. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा, अशी टीका करताना, सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?, अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी केली आहे.
खाकस्पर्श... pic.twitter.com/uBs5qq0qal
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022