"जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 05:48 PM2021-02-02T17:48:16+5:302021-02-02T17:52:09+5:30
खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, असं म्हणत राऊतांनी केली होती अर्थसंकल्पावर टीका
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी २०२१-२२ या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. तंसच अर्थसंकल्प सादर कोरोना कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. सुरुवातीलाच आरोग्य खात्यातील तरतुदी मांडताना तब्बल १३७ टक्क्यांची वाढ आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पात झाल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा... असा घणाघात केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर केला होता. त्यानंतर आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला.
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलं असून “जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…” अशा शब्दांत संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा, अर्थसंकल्पावर राऊतांचा घणाघात...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 2, 2021
जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा... @OfficeofUTpic.twitter.com/A1XEaajBgO
काय म्हणाले होते राऊत?
"केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागते, पण महाराष्ट्राला काय दिलं, त्यांच्या खिशात काय आहे? खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, तसे हे दिल्लीचे बाजीराव," असं म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली होती. महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवली, पण महाराष्ट्रावर कायम अन्याय झालाय. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे सरकार पाहत नाहीत. सध्या, आकड्यात पडायचं नाही, किती खरे-किती खोटे हे सहा महिन्यांनी कळतं. आता, आर्थिक थापा मारणं बंद केलं पाहिजे, सामान्य जनतेला पोटाची भाषा कळते, तरुणांना रोजगाराची भाषा कळत असल्याचं म्हणत राऊत यांनी सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळाले? असा सवाल उपस्थित केला आहे.