आता जनाबसेनेने उगाच मिशांना पीळ देऊ नये; भाजपा नेत्याचा टोला
By जयदीप दाभोळकर | Published: January 7, 2021 01:24 PM2021-01-07T13:24:25+5:302021-01-07T13:27:25+5:30
मंत्रिमंडळ निर्णयाच्या माहितीमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा करण्यात आला होता उल्लेख
औरंगाबादच्या नामांतरणावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असताना मंत्रिमंडळ निर्णयाच्या माहितीमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर ''कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ',' असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितलं होतं. यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांन जोरदार निशाणा साधला.
"संभाजीनगर प्रकरणी निलाजरी माघार घेतल्यानंतर आता जनाबसेनेने उगाच मिशांना पीळ देऊ नये. राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली," असं म्हणत भातखळकर यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्यामाध्यमातून यावर निशाणा साधला.
संभाजीनगर प्रकरणी निलाजरी माघार घेतल्यानंतर आता जनाबसेनेने उगाच मिशाना पीळ देऊ नये... राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली...@OfficeofUT@MiLOKMATpic.twitter.com/bh4cEQ78jU
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 7, 2021
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादच्या उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र याचदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ३ ट्वीट करत नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर आता ''कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ'', असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितलं आहे.