Maharashtra Politics: “प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट घरी बसून करता येत नाहीत”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 11:11 AM2022-10-31T11:11:44+5:302022-10-31T11:12:24+5:30
Maharashtra News: आणखी एक मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाऊन काहीच दिवस लोटले असताना, टाटा एअरबसचा प्रकल्पही गुजरात गेला. यावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये खडाजंगी होत आहे. यानंतर आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरून भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट घरी बसून करता येत नाहीत, असे टोला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यातच विमान आणि रॉकेटचे इंजिन बनवणारी कंपनी सॅफ्रन कंपनीने आपला प्रकल्प हैदराबादला नेल्याचे सांगितले जात आहे. यावरून अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट करावे लागतात
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, नाणार प्रकल्प बुलेट ट्रेन आरे मेट्रो कार शेड यांना विरोध करणाऱ्या वसुली महाविकास आघाडीने त्यांच्या काळात अन्य राज्यात गेलेल्या प्रकल्पावरून आता उफराटे आरोप करू नयेत. चिड़िया चुग गई खेत... प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट घरी बसून करता येत नाहीत, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तत्पूर्वी, सॅफ्रन कंपनीची १११५ कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प हैदराबादला जात असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकल्पही मिहानमध्ये उभारला जाणार होता. जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्याने हा प्रकल्प महाराष्ट्रातून हैदराबादला गेल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेकडो जणांचे रोजगार गेल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, वायुसेनेसाठी सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनविण्याची जबाबदारी टाटा एअरबसला सोपविली आहे. कंपनी बडोदा येथील प्लांटमध्ये याची निर्मिती करणार आहे. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेससोबत सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या करारावर सही केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"