Virar Hospital Fire : "राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 01:17 PM2021-04-23T13:17:03+5:302021-04-23T13:19:58+5:30
Rajesh Tope on Virar Hospital Fire : टोपेंच्या वक्तव्यावरून भाजप नेत्याचा निशाणा. विरार दुर्घटना राष्ट्रीय बातमी नसल्याचं टोपेंनी केलं होतं वक्तव्य.
विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण (Virar Hospital Fire) आग लागली. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली होती. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. याच दरम्यान आता आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी ही राष्ट्रीय बातमी नसल्याचं धक्कादायक विधान केलं. यारून आता त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टोपेंवर जोरदार निशाणा साधला.
"किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे! अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा. त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी दुःख तरी व्यक्त करा. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो," अशा शब्दांत भातळकर यांनी टोपे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे!अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा, दुःख तरी व्यक्त करा त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी. @rajeshtope11 तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो. https://t.co/X7DSPX8Y5z
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 23, 2021
काय म्हणाले होते टोपे?
"आपण रेमडेसिवीरवर बोलू शकतो. ऑक्सिजनबाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल," असं टोपे यांनी म्हटलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडेसिवीरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना (विरार रुग्णालय आग) ही राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत," असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.