“एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:48 AM2023-03-27T11:48:37+5:302023-03-27T11:49:07+5:30
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेपूर्वी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी बॅनरही लावण्यात आले होते.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव इथं जाहीर सभा पार पडली. तत्पूर्वी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. एकीकडे उर्दू भाषेतील पोस्टर शहरात लावण्यात आले होते, तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचा उल्लेख करत लोकांना ठाकरे गटाकडून भावनिक आवाहन आले होते. दरम्यान, यावरून भाजप नेत्यानं उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला.
“एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?” असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना टोला लगावला. (ट्वीट वाचा)
सभेपूर्वी बॅनरबाजी
मालेगावच्या सभेसाठी शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. दरम्यान, सभेच्या अर्धा किमी अंतरावर असलेल्या महात्मा फुले चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या पोस्टरनं सर्वांचे लक्ष वेधलं होतं. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात केलेल्या विधानाचा उल्लेख करण्यात आला होता. जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा... असं भावनिक आवाहन ठाकरे गटाकडून लोकांना करण्यात आलं होतं.