“मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी”
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 02:44 PM2022-06-23T14:44:25+5:302022-06-23T14:45:11+5:30
भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला.
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अपक्ष मिळून ४२ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ १८ आमदार असल्याचं कळतंय. गुवाहाटीच्या हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घोषणा दिली जात होती. शिंदे गटात सहभागी असलेले आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचं प्रखरतेने दिसून येते. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी,” असं म्हणत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 23, 2022
ही आहे आमदारांची भावना... pic.twitter.com/U6FxBzp1QG— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
एकनाथ शिंदेंचं पत्र
एकनाथ शिंदेनी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र जाहीर केलं आहे. त्यामध्ये, एकनाथ शिंदेंनी शिंदे गटातील आमदारांच्या भावना स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेना पक्षप्रमुखांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी तीन पानी पत्र लिहून आपली भावना व्यक्त केली आहे. त्यामध्ये, बडव्यांपासून होणारा त्रास, मातोश्री किंवा वर्षा बंगल्यावर ताटकळत बसावं लागणं आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन अयोध्या दौऱ्यावेळी झालेली अवहेलना शिरसाट यांनी पत्रातून मांडली आहे.