"सुप्रिया सुळे यांचा तो आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणं," भातखळकरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 02:00 PM2022-06-06T14:00:21+5:302022-06-06T14:01:34+5:30
आमचे दोन नेते, ज्यांनी काहीही केलं नाही ते सध्या तुरुंगात आहेत. आज नाही तर उद्या न्यायालयाकडून न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य.
“आमचे दोन नेते, ज्यांनी काहीही केलं नाही ते सध्या तुरुंगात आहेत. आज नाही तर उद्या न्यायालयाकडून न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. माझं हे बोलणं रेकॉर्ड करून ठेवा. जेव्हा ते दोघं जण बाहेर येतील आणि त्यांना क्लिन चीट मिळेल, तेव्हा माझं हे रकॉर्डिंग नक्की दाखवा,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावरुन भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला.
“अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा कोणताही दोष नसताना त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे, हा सुप्रिया सुळे यांचा आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणे आहे. देशमुखांची चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. मलिक यांच्याबाबतीत प्रत्येक न्यायालयाने प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे सांगितले आहे,” असं भातखळकर म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंना टोला लगावला.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा कोणताही दोष नसताना त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे, हा सुप्रिया सुळे यांचा आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणे आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 6, 2022
देशमुखांची चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली,मलिक यांच्याबाबतीत प्रत्येक न्यायालयाने प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे सांगितले आहे. https://t.co/psgdeDBuER
काय म्हणाल्या होत्या सुळे?
“दोन्ही केसेस मध्ये काय होतंय हे मला माहित आहे. कशाप्रकारे जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. तुम्ही डेटा काढून पाहा, जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावरच धाड टाकली जात आहे. त्यांचा जागतिक विक्रम आहे. त्यांनी १०९ वेळा देशमुख कुटुंबीयांच्या घरी धाड टाकली आहे. १०८ वेळा धाड टाकताना काय केलं? १०९ व्यांदा धाड टाकावी लागली कारण त्यांना १०८ वेळा काहीच मिळालं नाही.” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
“हे सर्व आश्चर्यचकित करणारं आहे. ज्या व्यक्तीवर सर्व व्यक्तीवर आरोप आहेत, तोच आच माफीचा साक्षीदार होतोय, हे दुसरं आश्चर्य आहे. ज्यांनी स्वत: कबुल केलंय तो आज माफीचा साक्षीदार कसा बनू शकतो, हा कोणता न्याय आहे. मोदीजी तुम्ही हा कोणता न्याय करताय असं मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना संसदेत विचारणार आहे. मी मोदीजींपासून नाराज नाही पण नक्कीच आश्चर्य वाटतंय की हे काय होतंय?,” असंही त्यांनी म्हटलं.