छत्रपती संभाजीराजे यांना भाजपनं किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीयेत : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:58 PM2021-05-27T12:58:41+5:302021-05-27T13:01:18+5:30
Chatrapati Sambhajiraje : यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली नसल्यानं छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली होती नाराजी. आपल्या राजीनाम्यानं मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागत असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊ असंंही वक्तव्य त्यांनी केलं होतं.
खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. "माझा राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल, समाजाला न्याय मिळत असेल तर मी खासदारकीचा राजीनामा देईन," असे आक्रमक मत राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं होतं. पक्ष म्हणून भाजपनं त्यांना किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. परंतु त्यांनी भेट दिली नसल्याचं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर पाटील यांनी भाष्य केलं.
"छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज आहेत. त्यांना भाजप कार्यालायात बोलावणार का? असं न करता त्यांना राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर न्यावं असं मोदींनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदारकी देण्यात आली. यानंतर त्यांची ओळख करून देण्यासाठी एकदा अमित शाह यांनी त्यांना प्रयागराजला राष्ट्रीय बैठकी त्यांचं अभिनंदन आणि ओळख करून देण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी त्यांना चार्टर प्लेननं घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो," असं पाटील म्हणाले. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राज्यसभेवर आले आहेत. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वजण उभे राहुया असं अमित शाह म्हणाल्याचंही त्यांनी सांगितलं.
"त्यांना किती सन्मान दिला, त्यांची किती कामं मार्गी लावली, रायगड विकासासाठी किती निधी दिला हे ते सांगत नाहीयेत आणि इतरांना माहित नाही. यावेळी चार वेळा त्यांनी भेट मागितली आहे. परंतु त्यापूर्वी चाळीस वेळा त्यांनी मोदींशी भेट झाली आहे. कोरोनामुळे आणि दुसरं म्हणजे ज्यासाठी ते भेट मागतायत त्याचं समाधान माझ्याकडे नाही तर राज्याकडे आहेत या कारणांमुळे त्यांची भेट झाली नसावी. या भेटीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीनं काय केलं हे मी सांगत नाही. ते मोदींनी भेट दिली नाही म्हणून ओरडत आहेत. त्यांना कार्यालयात यायला लागू नये म्हणून त्याच मोदींनी त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली," असंही ते म्हणाले.