मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर अजून झालाच नाही, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 08:51 PM2020-08-31T20:51:03+5:302020-08-31T21:04:24+5:30
मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा वापर न करता राज्य सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
मुंबई : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले असून अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये पीएम केअर फंडमुळे देशभरातील अनेक लोकांना आधार मिळाला. एकीकडे, पीएम केअर फंडच्या माध्यमातून लोकांना सतत मदत केली जात आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'चा अद्यापही वापर झाला नाही, असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा वापर न करता राज्य सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
याचबरोबर, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच मुख्यमंत्र्यांनी आम्ही इतक्या चाचण्या केल्या. आम्ही हे सर्वप्रथम केलं. आम्हीच या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, असा कांगावा केला होता. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, मृत्युदर वाढत असताना राज्य शासनाचा अपयशी कारभार निदर्शनास येत आहे. वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये 550 कोटी रुपये जमा झाले होते. मात्र आतापर्यंत केवळ 132 कोटी 25 लाख रुपयांचा वापर करण्यात आला आहे, ही मदत सुद्धा केवळ स्थलांतरित मजुरांना केली गेली, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा वापर न करता जनतेच्या जीवाशी खेळत आहे राज्य सरकार ! pic.twitter.com/xhtvYWOpLd
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 31, 2020
आज जेथे राज्यात नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि अनेक शहरांमध्ये नागरिक कोरोनाच्या युद्धात लढताना कमजोर पडत आहेत. कारण त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. दुसरीकडे राज्यभरात गंभीर परिस्थिती उद्भवली असतानाही शासनाने या रक्कमेचा रुग्णांसाठी तसेच इतर सुविधा पुरवण्यासाठी वापर का केला नाही? ज्याठिकाणी जास्त गरज आहे, तिथे एक दमडीसुद्धा या साहाय्यता निधीमधून देण्यात आली नाही, जी फार लज्जास्पद बाब असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
गेल्या 4 ते 5 महिन्यांत राज्य शासनाकडून या साहाय्यता निधीतून कोणत्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या, यावर शंका उपस्थित होते. या निधीतुन केवळ एका 16 कोटींच्या प्लाझ्मा थेरपीसाठी आणि 20 कोटी मुंबईतील एका रुग्णालयाला दिले गेले. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत आहे, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व लक्षात घेता चाचण्या वाढवणे आणि बेड्सची निर्मिती करणे, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करणं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र, यादेखील शासनाकडून योग्यरित्या केल्या गेल्या नाहीत. करण्याची गोष्टदेखील दूर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
याशिवाय, वाळूजमध्ये एका कोरोना संशयित वृद्ध महिलेला झाडाखाली ऑक्सिजन सिलेंडर लावून बसवण्यात आले होते, इतकी वाईट परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे. हे सरकार जनतेची मदत न करता, त्यांची पर्वा न करता केवळ त्यांच्या जीवाशी खेळत आहे, जनता सर्व पाहत आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
आणखी बातम्या...
- सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता
- आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो
- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...
- काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...
- धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं
- अॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर
- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा
- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार