संजय राऊत उल्लेख करत असलेले भाजपचे 'ते' साडे तीन नेते कोण? चंद्रकांत पाटील म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 03:48 PM2022-02-15T15:48:49+5:302022-02-15T15:49:17+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला आव्हान; भाजपच्या नेत्यांचं प्रत्युत्तर
पुणे: हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला रोखठोक इशारा दिला. पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असंदेखील राऊत म्हणाले. आता हे साडे तीन नेते कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांच्या मनात काय आहे, ते नेमकं कोणाला उद्देशून बोलत आहेत ते मी कसं काय सांगणार, असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला. राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन. मी दिल्लीला निघालो आहे. त्यामुळे राऊत यांची पत्रकार परिषद सुरू असताना मी प्रवासात असेन. मला दिल्लीत पत्रकार याबद्दल विचारतीलच. त्यावेळी मी प्रतिक्रिया देईन, असं पाटील यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते संजय राऊत?
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांपाठोपाठ महाविकास आघाडीचे मंत्री तुरुंगात जातील. त्यांच्या कोठडीच्या बाजूला त्यांची जागा असेल असं भाजपचे नेते वारंवार सांगत असतात. पण पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक त्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील. राज्यात सरकार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा, असा गर्भीत इशाराच राऊत यांनी दिला.
आम्हाला वारंवार धमत्या दिल्या जाताहेत. आव्हानं दिली जात आहेत. राजकारणात एक मर्यादा असते. ती ओलांडली गेली आहे. हमाम सब नंगे होते है. आम्हाला धमक्या देऊ नका. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. मी तर अजिबात भीत नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा, असं राऊत म्हणाले.