...म्हणून पंकजाताईंचं मोठं नुकसान होतंय; चष्म्याच्या व्हिडिओवरून चर्चा रंगताच चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 12:52 PM2023-11-24T12:52:56+5:302023-11-24T13:15:30+5:30
पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमरावती - भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे त्यांच्या पक्षात खच्चीकरण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असते. त्यातच काही दिवसांपूर्वी पंकजा यांनी त्यांना चष्मा लागल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने लक्ष वेधून घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"पंकजाताई फक्त शिंकल्या तरी बातमी होते, त्या हसल्या तरी बातमी होते आणि कधी गंभीर झाल्या तरी बातमी होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं दुर्दैव आहे की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढला जातो. तुम्ही त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे," असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
नक्की काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
आपल्याला चष्मा लागला असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिली होती. याच व्हिडिओत त्यांनी उपरोधिकपणे भाष्य केल्याने सदर व्हिडिओ सर्वत्र चर्चा झाली. "ताईला चष्मा लागला. लांबचा चष्मा नाही बरं का, हा जवळचा चष्मा आहे. मला जवळचं कमी दिसत होतं वाटतं. पण ते आता स्पष्ट दिसायला लागेल," असं पंकजा यांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
पंकजा मुंडे आणि भाजपमधील संघर्ष
राज्यात २०१४ साली भाजप सत्तेत आल्यापासून पंकजा मुंडे यांचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाल्याचं बोललं गेलं. त्यांचे पंख छाटले जात असल्याची भावना मुंडे समर्थकांमध्ये तयार झाली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतलं जाण्याची शक्यता होती. पक्षाकडून त्यांना तसं कळवलंही गेलं होतं. मात्र ऐनवेळी हा निर्णय बदलला गेला. तसंच पक्ष संघटनेत राज्य स्तरावर त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी जाहीर व्यासपीठावरून अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आपली नाराजी बोलून दाखवली आहे.