“हिंदू या शब्दातच धर्मनिरपेक्षता आहे”; चंद्रकांत पाटलांचे मोहन भागवतांना समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 05:47 PM2022-04-14T17:47:06+5:302022-04-14T17:48:04+5:30
मोहन भागवतांच्या वक्तव्यात कुठेही हिंसाचार नाही. पण हिंदू आता मार खाणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी येणाऱ्या २० ते २५ वर्षांत भारत अखंड भारत होईल. पण आपण थोडे प्रयत्न केले, तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांतच साकार होईल. याला रोखणारे कुणीही नाही. जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील. एवढेच नाही, तर सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे, असे म्हटले आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर भाष्य केले आहे.
परमपूज्यनीय मोहन भागवत यांच्या म्हणण्यावर मी काही म्हणणे योग्य नाही. पण ताकद इतकी वाढवावी लागते की ती परत वापरावीच लागत नाही असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. हिंदुत्व हा शब्द तुम्ही पूजा पद्धतीशी जोडू नका, संघाला पूजा पद्धतीशी संबंधित अभिप्रेत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. हिंदू या शब्दातच धर्मनिरपेक्षता आहे. हिंदू राजाने कधीही मशिदींवर, चर्चवर हल्ला केल्याचं एकही उदाहरण नाही, हिंदू या शब्दातच सर्व धर्मांना समान भाव मिळणे आहे, असे पाटील यांनी नमूद केले.
सगळ्या जगाचे एक राष्ट्र आणि नेतृत्व हिंदू
हिंदू राष्ट्राचा विचार केला तर जिथे हिंदू संस्कृती होती. मंदिरे आहेत, हिंदू विचाराने जीवनपद्धती आहेत असे खूप लांबपर्यंत जावे लागेल. आता त्या सगळ्यांना भारताच्या राजकीय नेतृत्वाखाली आणण्याची संघाची कल्पना नाही. संघाची भूमिका मोहन भागवतांनीच मांडली पाहिजे. मोहन भागवत यांच्या कल्पनेत, विचारात, मांडणीत अशा प्रकारे सगळ्या जगाचं एक राष्ट्र आणि नेतृत्व हिंदू असे नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
संघाला आपली ताकद वापरावीच लागत नाही
संघाला आपली ताकद वापरावीच लागत नाही. संघ ताकदच अशी निर्माण करतो जी वापरावली लागत नाही, असे पाटील म्हणाले. तसेच मोहन भागवतांनी हातात दंडुके घेण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता ते म्हणाले की, मोहन भागवतांच्या वक्तव्यात कुठेही हिंसाचार नाही. पण हिंदू आता मार खाणार नाही, सहन करणार नाही. मी हिंदू आहे आणि मला अभिमान आहे हे तर कोणीही म्हणेल. हिंदू हा एक विचार आहे, जीवन जगण्याचा व्यवहार आहे. त्याअर्थी सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणून त्यांना हिंदू अपेक्षित आहेत. त्याला आडवे येणारे या अर्थाने त्यांनी म्हटले आहे, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.