मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प; चंद्रकांत पाटील यांचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:37 PM2021-03-10T13:37:57+5:302021-03-10T13:39:52+5:30
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) भाजपकडून (BJP) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणात स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह (Mansukh Hiren Death Case) संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले असून, त्याचे तीव्र पडसाद विधीमंडळात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात भाजपकडून (BJP) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. यावरून आता जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प, अशी भूमिका घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. (bjp leader chandrakant patil warns thackeray govt over sachin vaze and mansukh hiren case)
मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांनी हिरेन यांचा खून केल्याचे म्हटले होते. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युचा मुद्दा भाजपाने लावून धरला आहे. भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर निवेदन करण्याची मागणी केली आहे. तसेच एकामागून एक तीन ट्विट करत चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मनसुख हिरेन खून प्रकरणी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध ! प्रश्न कालपण तेच होते, प्रश्न आजही तेच आहेत... जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प !!! @OfficeofUT 1/3 pic.twitter.com/ivVeC8jM9C
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 10, 2021
फेसबुकवर संवाद साधणारे मुख्यमंत्री गप्प का?
फेसबुकवर संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? मनसुख हिरेनची पत्नी सचिन वाझेवर का संशय घेत आहे?, मनसुख हिरेनची हत्या झाल्याचे त्यांच्या पत्नीला का वाटते?, मनसुख हिरेनची गाडी सचिन वाझे वापरत होते का?, असे एकामागून एक प्रश्नांनी सरबत्ती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मनसुख हिरेन खून प्रकरणी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध. प्रश्न कालपण तेच होते, प्रश्न आजही तेच आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
होय, मी लस घेतली, हात दुखतोय म्हणून काळजी घेत आहे: संजय राऊत
सचिन वाझे यांना पाठिशी कोण घालतंय?
मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना कोण पाठिशी घालत आहे? मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांचा काय संबंध? मनसुख हिरेन तपासामधून सचिन वाझे यांना बाजूला का केले? पोलीस सेवेतून निलंबित सचिन वाझे ठाकरे सरकारमध्ये पुन्हा पोलीस सेवेत कसे काय आले? धनंजय गावडे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत? वादात सापडलेले सचिन वाझे हे शिवसेनेचे सदस्य आहेत का? असेही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर करत विचारले आहेत.
दरम्यान, सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवले जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. वाझेंना पाठिशी घालण्याचे कारण काय, असा सवाल भाजपकडून वारंवार उपस्थित केल्यानंतर अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावे लागले. वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली.