“हिंदुत्वाचा वसा घेतलेले एकनाथ शिंदे प्रगल्भ, महायुतीला मजबूत करायचे काम करतात”: बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 15:06 IST2025-02-22T15:03:46+5:302025-02-22T15:06:26+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम शिंदे करत आहेत. त्यामुळेच भाजपा सेना युती अधिक मजबूत झाली आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

“हिंदुत्वाचा वसा घेतलेले एकनाथ शिंदे प्रगल्भ, महायुतीला मजबूत करायचे काम करतात”: बावनकुळे
BJP Chandrashekhar Bawankule News: एकीकडे ठाकरे गटाचा मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचे दावे करण्यात येत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर थेट शब्दांत भाष्य केले आहे.
मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत. एकनाथ शिंदे प्रल्गभ नेते असून, महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत. एकनाथ शिंदे महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करतात. एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये. विरोधकांना नामोहर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी नेहमी केल आहे. हिंदुत्वाचा वसा घेतलेले काम एकनाथ शिंदे करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम शिंदे करत आहेत. त्यामुळेच भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे. आता राजकारण नको. लोकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करायची आहे. महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा यासाठी आता महायुती काम करते आहे, असे बावनकुळे यांनी नमूद केले.
प्रत्येक जण आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे यासाठी काम करत आहे
भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विधानावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजपा मजबूत झाली पाहिजे ही साहजिक भावना नितेश राणेंनी व्यक्त केली. प्रत्येक जण आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे यासाठी काम करत आहे. तर उदय सामंत आणि राज ठाकरे भेटीवर बोलताना, राज ठाकरे यांचे सर्वांची चांगले संबंध आहेत. ते सर्वांचे मित्र आहे. त्यामुळे अशा किती भेटी होत असतात, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय फडणवीसांकडून बदलले जात आहेत. त्याशिवाय शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत खुलासा करताना सांगितले की, माझी रेषा छोटी करण्यापेक्षा आपली रेषा मोठी करण्याचा विरोधकांनी प्रयत्न करावा. माझ्यात आणि देवेंद्रजीमध्ये कोणतेही कोल्ड वॉर नसून राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र करत आहोत. हा फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे.