Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस १८ तास काम करत राहिले तर महाविकास आघाडी संपल्याशिवाय राहणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:19 PM2022-12-17T18:19:58+5:302022-12-17T18:20:59+5:30
Maharashtra Politics: शिंदे आणि फडणवीस यांची विकासाची बुलेट ट्रेन निघाली आहे. याच निराशेपोटी, भावनिक मुद्याला हात घालून हा मोर्चा काढला, अशी टीका भाजपने केली आहे.
Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न, महागाईल, बेरोजगारी यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. भाजपकडून या मोर्चावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस १८ तास काम करत राहिले तर महाविकास आघाडी संपल्याशिवाय राहणार नाही, असा दावा करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
निराशेपोटी आणि भावनिक मुद्याला हात घालून हा मोर्चा काढला गेला आहे. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला आहे. पण आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जात आहे. हे त्यांचे दुखणे असून त्या भीतीने हे मोर्चे निघत आहेत. विकासाच्या मुद्यांवर बोलायचे असेल किंवा चर्चा करायची असल्यास विदर्भ आणि मराठवाड्यात या ,आम्ही त्यांना विकास दाखवून देऊ, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
...तर महाविकास आघाडी संपल्याशिवाय राहणार नाही
ते विकासाच्या मुद्यावर कधी बोलू शकत नाही. त्यांनी कधीही विकासाचा कधी अजेंडा दिला नाही. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची विकासाची बुलेट ट्रेन निघाली आहे. या बुलेट ट्रेनमुळे महाविकास आघाडीमधील नेते हताश झाले असून हे दोघे जर १८ तास काम करीत राहिले तर महाविकास आघाडी संपल्याशिवाय राहणार नाही, असा मोठा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून शिव जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे किंवा शिवनेरी गडावर पायी चालत जाणे असो, त्यातून त्यांनी त्यांची भावना दिसून येते. तसेच महापुरुषांबद्दलच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करीत नाही. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता महापुरुषांना मानणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व जण काम करीत आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"