Maharashtra Politics: “सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत”; चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 03:18 PM2023-01-09T15:18:16+5:302023-01-09T15:19:43+5:30

Maharashtra News: वाईट याचे वाटते की, ज्या बाईला तुम्ही त्याठिकाणी बसवले आहे. तिला याच्यात विकृती दिसत नाही, असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे.

bjp leader chitra wagh replied ncp mp supriya sule over rupali chakankar uorfi javed row | Maharashtra Politics: “सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत”; चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर

Maharashtra Politics: “सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत”; चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर

googlenewsNext

Maharashtra Politics: अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील वाद वाढताना पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती वजा सल्ला दिला होता. यावरून आता चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. सल्ले द्यायचे असतील, तर तुमच्या घरात द्या. आम्हाला नकोत, या शब्दांत चित्रा वाघ यांनी पलटवार केला. 

राज्याच्या राजकारणात सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते. अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरु आहे. महिलांना माते समान सन्मान आहे, तिथे हे घडतेय, हे दुर्दैव आहे, अशी खंत व्यक्त करत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा. महाविकास आघाडीकडून आम्ही पुढाकार घेऊ. महिला आयोगाच्या अध्यक्षा काही करत नाहीयेत. जशी त्यांच्या घरात एक मुलगी आहे, तशीच त्यांच्याही घरात एक मुलगी आहे. अनेक महिलांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे आपले काम नाही. महिला आयोग त्यांच्या नियमांप्रमाणे काम करेल. त्याविषयी चर्चा कशाला करायची, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. यावर आता चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. 

सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत

समाजस्वास्थाचे काम करण्यात येते, तिथे राजकारण करण्याची गरज नसते. जे राजकारण करण्यासाठी उड्या मारत आहेत, त्यांना गुळ-खोबर देऊन आमंत्रण दिल नव्हते. सुप्रिया सुळे सांगत आहेत, हे थांबवा. मी माझ्याकडून थांबवते. पण, ही विकृती थांबवण्यासाठी हा लढा सुरु आहे. वाईट याचे वाटते की, ज्या बाईला तुम्ही त्याठिकाणी बसवले आहे. तिला याच्यात विकृती दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला काही सल्ले द्यायचे असतील, तर तुमच्या घरात द्या. आमच्या घरात देण्याची गरज नाही, या शब्दांत चित्रा वाघ यांनी पलटवार केला. 

आमचा अभ्यास एकदम पक्का आहे

चित्रा वाघ यांचा अभ्यास कमी आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. यावर चित्रा वाघ यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, तुमचा अभ्यास किती आणि काय आहे, तो पेपर सुप्रिया सुळे यांच्या दरबारात सोडवावा. आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमचा अभ्यास किती आहे किंवा किती नाही, हे पाहून त्याठिकाणी बसवले नाही आहे. आमचा अभ्यास एकदम पक्का आहे, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp leader chitra wagh replied ncp mp supriya sule over rupali chakankar uorfi javed row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.