ट्विटवरुन गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का?; चित्रा वाघ यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:07 AM2021-10-28T10:07:18+5:302021-10-28T10:07:18+5:30
महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नबाव मलिक (Nawab Malik) यांना कोणी दिला?, चित्रा वाघ यांचा सवाल
क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यापासून NCB च्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. क्रुझवर उपस्थित असणाऱ्या बड्या ड्रग्ज माफियाला समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सोडून दिलं असा दावा मलिकांनी केला आहे. मलिक हे सातत्याने समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे, वानखेडे कुटुंबीयही मैदानात उतरले असून पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना इशाराच दिला आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला.
"महाविकास आघाडीमधील मंत्री नवाब मलिक हे एका महिलेची कौटुबीक विषयाबाबतची बदनामी करताना दिसत आहेत. ते काझी म्हणतायत की त्यांच्याजवळ असलेली कादगपत्रे खरी आहेत. त्याची शाहनिशा न्यायालयीन प्रक्रियेमधून होऊ शकते. परंतु अशा पद्धतीनं महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नबाव मलिक यांना कोणी दिला," असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलीक हे खुलेआम एका महिलेच्या कौटुंबिक विषयाबाबत सर्व माध्यमांपुढे नाहक बदनामी करातायेत.
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 28, 2021
साध्या ट्विटवर गुन्हा दाखल करणारे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आज उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का आहेत? pic.twitter.com/nszWr7jA07
"एका ट्वीटवरून गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्रीदेखील उघडपणे महिलेची होत असलेली वैयक्तिक बदनामी ऐकताना पाहतानादेखील गप्प कसे काय? यावरू एक गोष्ट सिद्ध होते, ज्या काँग्रेसी प्रवृत्तीने डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूकीत पराभव केला होता, ती काँग्रेसी प्रवृत्ती जेव्हा सत्तेवर येते तेव्हा दलित आणि शोषितांवर अन्याय झालेला पाहायला मिळतो," असंही त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते मौलाना?
२००६ मध्ये मौलाना मोहम्मद अहमद यांनी समीर वानखेडेंचा निकाह केला होता. त्यांनी या प्रकरणावर भाष्य करत म्हटलंय की, २००६ मध्ये लग्नादरम्यान समीर वानखेडे यांनी स्वत:ला मुस्लिम असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर समीर वानखेडे यांचा शबाना यांचाशी निकाह झाला. निकाहच्या वेळी समीर आणि शबाना दोघे ही मुस्लिम धर्मीय होते. जर समीर वानखेडे मुस्लीम नसते तर मी निकाह करुन दिला नसता, असा दावा मौलाना अहमद यांनी केला होता.
संयमाचा बांध फुटतोय
"नवाब मलिक हे घाणेरडं राजकारण करत आहेत, ते आमच्या वैयक्तिक बाबी, फोटो, कागदपत्रे सोशल मीडियावरुन जाहीर करत आहेत. आता, आमच्या संयमाचा बांध फुटत आहे, त्यामुळे आता आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू," असा इशाराच क्रांती रेडकर यांनी दिलाय. तसेच, नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या बर्थ सर्टीफिकेटवरुन चॅलेंज दिले होते. जर, मी शेअर केलेला जन्मदाखला खोटा असेल, तर मी राजकारण सोडून देईन असे मलिक यांनी म्हटले होते. त्यावरही, रेडकर यांनी उत्तर दिलं, आता त्यांना ते सोडावं लागेल, असं रेडकर यांनी म्हटलंय.