…त्यामुळे शरद पवारांनी 'डबलगेम' केला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 06:34 PM2023-07-03T18:34:20+5:302023-07-03T18:35:08+5:30
मी माझ्या पक्षासोबत बोलणी केली. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी यश येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले असं फडणवीस म्हणाले.
मुंबई - २०१९ च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. बहुमत आल्यानंतर संख्याबळ पाहून उद्धव ठाकरेंनी विरोधकांसोबत मिळून सरकार बनवले. त्यांनी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. आमच्या १० जागा जास्त आल्या असत्या तर हे घडले नसते. बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत बोलणे टाळले, फोन घेतले नाही. त्यानंतर आमच्या लक्षात आले. तेव्हा राष्ट्रवादीकडून आम्हाला संपर्क झाला. ३ पक्षांचे सरकार बनू शकत नाही. त्यामुळे स्थिर सरकार येण्यासाठी भाजपा-राष्ट्रवादीने एकत्र आले पाहिजे असं म्हटलं असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी माझ्या पक्षासोबत बोलणी केली. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी यश येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही बैठक शरद पवारांसोबत घेतली. शरद पवारांनीही स्थिर सरकारसाठी भाजपा-राष्ट्रवादी एकत्र यावं ही गोष्ट मान्य केली. शरद पवारांनी ही जबाबदारी अजित पवार आणि माझ्यावर दिली. कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार, पालकमंत्री कोण असतील ही यादी आम्ही बनवली. त्यानंतर शरद पवारांनी माघार घेतली. तेव्हा अजित पवारांनी इतक्या पुढे जाऊन पुन्हा माघारी फिरणार नाही अशी भूमिका घेतली मग आम्ही शपथविधी सोहळा घेतला. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही बहुमत चाचणी घेतली असती तर आमदार अपात्र ठरले असते. कारण अजित पवारांसोबत आमदार होते पण पक्ष नव्हता. त्यामुळे अजित पवार पुन्हा परतले. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला आणि शरद पवारांनी डबल गेम खेळला असा आरोप त्यांनी केला. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शरद पवारांना किंगमेकर अन् सत्ता हाती हवी असावी
माझ्या राजकीय माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात डील झाली होती. भाजपाला जर १३० हून अधिक जागा आल्या तर ते तुम्हाला विचारणार नाही असं पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यामुळे ज्याठिकाणी भाजपाचे उमेदवार असतील तिथे तुम्ही आम्हाला मदत करा. तुमच्या जागेवर आम्ही तुम्हाला मदत करू. त्यामुळे दोघांना चांगल्या जागा येतील. त्यातून तुमचीही बार्गिनिंग पॉवर वाढेल असा समझौता झाला. निकालानंतर संख्या पाहून उद्धव ठाकरेंनी पुन्हा शरद पवारांशी संपर्क साधला. पण पवारांच्या पक्षातील लोकांना स्थिर सरकार हवे होते. त्यामुळे शरद पवारांनी आम्हाला संपर्क साधला. जर आमचे सरकार बनले तर तुलनात्मक एक मजबूत मुख्यमंत्री बनतील. त्यानंतर नड्डा, अमित शाह, मोदी हेदेखील असतील. पण महाविकास आघाडी सरकार बनले तर किंगमेकरही मीच असेन आणि सत्ताही माझ्या हाती राहील असं पवारांना वाटले असावे असं मला वाटतं असंही फडणवीस यांनी म्हटलं.