राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 01:22 PM2021-04-03T13:22:00+5:302021-04-03T13:23:49+5:30
devendra fadnavis criticised cm uddhav thackeray: नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
नागपूर: राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन होणार का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, संपूर्ण कोरोना परिस्थितीत कोणते राज्य आपल्याच जनतेला त्रास देत असेल, तर ते महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कशासाठी भाषण केलं हेच समजलं नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis criticised cm uddhav thackeray)
नागपूर येथे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज गेल्या वर्षभरात दिले. देशातील अन्य राज्यांनीही जनतेसाठी पॅकेज दिले. केवळ महाराष्ट्राने एक पैशांचेही पॅकेज दिले नाही. मात्र, त्याऐवजी लोकांचे वीज कनेक्शन कापणे, लोकांना त्रास देणे यावरच भर दिला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट
मुख्यमंत्र्यांनी भाषण का केलं, ते समजलं नाही
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी केलेल्या आपल्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणे सांगितली नाही की, उपाययोजना सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केले? तेच समजले नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. राज्यात अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, उपाययोजना काय, व्यवस्था का नाही, याचे उत्तर द्यायला हवे होते. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला, या शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला.
दोन दिवसांत काय होणार आहे?
मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी दिलेल्या अल्टिमेटमवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. मुख्यमंत्री म्हणतात की, दोन दिवसांत बघा. काय दोन दिवसांत बघायचंय, अशी खिल्ली उडवत लॉकडाऊन अपवादात्मक परिस्थितीत करावे लागते. तो अपवाद आहे, नियम होऊ शकत नाही. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे अन्नधान्य, खात्यावर जाणारे पैसे, अन्य सुविधा यांचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवे. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.