अधिकाऱ्यांची जात काढणं अत्यंत दुर्दैवी, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:16 PM2021-10-26T18:16:36+5:302021-10-26T18:16:51+5:30
'समीर वानखेडे यांनी आपल्या प्रमाणपत्राबाबत सविस्तर खुलासा केला आहे.'
मुंबई: क्रुझ पार्टी आणि या संबंधीत प्रकरणावरुन महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) एनसीबी(NCB) आमने सामने आले आहेत. मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणे असे गंभीर आरोप केले आहेत. आता यावर माजी मुख्यंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
अधिकाऱ्यांना टार्गेट करणे अयोग्य
दादरा नगर हवेली येथे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावरुन आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे. वानखेडे यांनी आपल्या प्रमाणपत्राबाबत खुलासा केलाय, त्यामुळे विशिष्ट हेतूने आरोप करणं योग्य नाही. नवाब मलिक यांचे दुःख वेगळे आहे, ते स्पष्टपणे समोर येत आहे. अधिकाऱ्याला विशिष्ट हेतूने टार्गेट करणे योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.
...तर कुठलाच खटला टिकणार नाही
सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचे, हे जे सुरू आहे ते बरोबर नाही. साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायालयाबाहेर समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कुठलाच खटला टिकणार नाही. पण एक गोष्ट निश्चित की या प्रकरणात काही आरोप निश्चित झालेत. एनसीबीतील वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. पण त्याच वेळी तपास अधिकाऱ्यांना धमकावणे हे योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.