...तर शिवसेनेचा पीएम झाला असता; ठाकरेंच्या विधानाची फडणवीसांकडून चिरफाड; आकडेवारीच मांडली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 01:42 PM2022-01-24T13:42:40+5:302022-01-24T13:44:40+5:30
बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. त्यांनी शिवसेना सडवली असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचंय का? फडणवीसांचा सवाल
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोयीस्कर इतिहास सांगतात. त्यांनी पूर्ण इतिहास सांगायला हवा, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपसोबतच्या युतीत २५ वर्षे शिवसेना सडली म्हणणाऱ्या ठाकरेंचा फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाचार घेतला.
उद्धव ठाकरे इतिहासातील निवड घटना सांगतात. त्यांच्या सोयीचा इतिहास मांडतात. भाजप-शिवसेना युतीचा निर्णय बाळासाहेब ठाकरेंनी घेतला होता. २०१० पर्यंत तेच या युतीचे नेते होते. त्यामुळे बाळासाहेबांनी शिवसेना सडवली असं तर उद्धव ठाकरेंना म्हणायचं नाहीए ना? असा सवाल फडणवीसांनी विचारला. भाजपसोबतच्या युतीचा निर्णय वंदनीय बाळासाहेबांचा होता. त्यांच्या निर्णयावर प्रश्न विचारून त्यांच्या जयंतीला अपमान का करता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राम जन्मभूमी आंदोलनानंतर उत्तर भारतात शिवसेनेची लाट होती. त्यावेळी शिवसेनेनं उत्तर प्रदेशात निवडणूक लढवली असती तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. या विधानाचा फडणवीसांनी आकडेवारीसह समाचार घेतला. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेनं १८० उमेदवार दिले होते. त्यापैकी १७९ जणांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यानंतरच्या निवडणुकीत सेनेनं २४ उमेदवार दिले. त्यापैकी २३ जणांचं डिपॉझिट जप्त झालं होतं, अशी आकडेवारी फडणवीसांनी सांगितली.
शिवसेना जन्माला येण्याआधी मुंबईत आमच्या पक्षाचे नगरसेवक, आमदार होते. १९८४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढले होते. त्यामुळे कोण कोणाच्या मांडीवर होतं हे लक्षात येईल, असं फडणवीस म्हणाले. शिवसेना आमच्यासोबत असताना राज्यात होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असायची. आता आम्ही सोबत नसताना ते चौथ्या क्रमांकावर आहेत. शिवसेनेचं हिंदुत्व केवळ कागदावर आहे. भाषणाच्या पलीकडे हिंदुत्व उरलंय कुठे, असा सवाल फडणवीसांनी विचारला.