देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर; भाजपला नवा भिडू मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:14 PM2021-11-24T13:14:15+5:302021-11-24T13:33:12+5:30
देवेंद्र फडणवीस सपत्नीक शिवतीर्थावर; राज ठाकरेंसोबत फडणवीसांची चर्चा
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच शीवतीर्थ या नव्या घरात राहायला गेले. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे अनेक नेते राज यांच्या भेटी घेत आहेत. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता यांच्यासह राज यांच्या नव्या घरात पोहोचले. या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
काही दिवसांपूर्वीच राज यांनी त्यांचा मुक्काम कृष्णकुंजवरून शिवतीर्थावर हलवला आहे. राज यांचं नवं निवासस्थान जुन्या घराच्या अगदी शेजारीच आहे. राज यांनी नव्या घरात प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिवाळीला राज यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर प्रसाद लाड राज यांच्या भेटीला गेले होते. लाड हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/0GQ22028e6
— Lokmat (@lokmat) November 24, 2021
भाजप-मनसे युती होणार?
शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप एकाकी पडला. आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजपला एका साथीदाराची गरज आहे. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मनसेची ताकद आहे. त्यामुळे मनसेची मदत मिळाल्यास भाजपला फायदा होऊ शकतो. भाजपला मनसेसोबत थेट युती करण्यात अडचणी आहेत. मनसेची परप्रांतीयांबद्दलची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरते. त्यामुळे भाजप-मनसेची जाहीर युती होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र पडद्याआडून दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून मनसेनं हिंदुत्ववादी भूमिका अधिक प्रखरपणे घेतली आहे. पक्षाच्या झेंड्याचा रंगसुद्धा बदलण्यात आला आहे.