बाळासाहेबांनी 'तसा' शब्द घेतला असेल, असं वाटत नाही; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 10:00 PM2019-12-09T22:00:30+5:302019-12-09T22:04:13+5:30
फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल
मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह लावून धरला. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असा शब्द बाळासाहेबांना दिल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यावेळी वारंवार म्हटलं होतं. त्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत स्थापन केलेलं सरकार म्हणजे जनादेशाची प्रतारणा असल्याची टीका त्यांनी केली.
मला उद्धव ठाकरेंचं अतिशय आश्चर्य वाटतं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन बाळासाहेबांना दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. पण काँग्रेसच्या पाठिंब्यानं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन बाळासाहेबांनी उद्धव यांच्याकडून घेतलं असेल, असं मला वाटत नाही, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला. बाळासाहेबांनी काँग्रेसवर कायम टीका केली होती. त्यांनी काँग्रेसला टोकाचा विरोध केला होता. मात्र आता उद्धव ठाकरे त्याच काँग्रेससोबत गेले आहेत, असंदेखील फडणवीस लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
शिवसेना आमच्यासोबत असताना त्यांचा मान राखला जायचा. मात्र आता परिस्थिती वेगळी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. 'शिवसेना आमच्यासोबत असताना मातोश्रीवरुन आदेश द्यायचे आणि आम्ही ते आदेश पाळायचो. मात्र आता त्यांना सिल्व्हर ओक, ट्रायडंटवर जावं लागतं,' असा चिमटा फडणवीसांनी काढला. आता सामनाचे अग्रलेख बघा. त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यांना काँग्रेसला खूश ठेवायचं आहे. याशिवाय जुन्या मतदारांनादेखील सांभाळायचं आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर त्यांनी 'नरो वा कुंजरो वा' अशी भूमिका घेतली आहे. तीन पक्षांचं सरकार फार काळ चालत नाही, हा इतिहास आहे, असं फडणवीस म्हणाले.