पवारांच्या भेटीनंतर 'मातोश्री'वर थेट; एकनाथ खडसे घेणार उद्धव ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 07:14 PM2019-12-09T19:14:14+5:302019-12-09T19:29:45+5:30
भाजपाच्या एकाही नेत्याची भेट न घेता खडसे राज्यात परतणार
नवी दिल्ली: भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी भेटीगाठींचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर उद्या खडसे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. विशेष म्हणजे आपली खदखद व्यक्त करण्यासाठी दिल्लीला गेलेले खडसे भाजपाच्या एकाही नेत्याला भेटल्याशिवाय मुंबईत परतणार आहेत. खडसेंनी परवाच स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त करत पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीगाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. आपल्या मनातील हीच खदखद ज्येष्ठ नेत्यांकडे व्यक्त करण्यासाठी खडसे आज दिल्लीला पोहोचले होते. मात्र त्यांनी भाजपाच्या एकाही नेत्याची भेट घेतली नाही. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आज लोकसभेत होते. मात्र राज्यसभा खासदार असलेल्या कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांचीही खडसेंनी भेट घेतली नाही.
भाजपाच्या एकाही वरिष्ठ नेत्याला न भेटलेले खडसे संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी ६ जनपथवर पोहोचले. त्यांनी पवारांसोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. सिंचन प्रकल्पाच्या प्रश्नावर पवारांची भेट घेतल्याचं खडसेंनी सांगितलं. आता खडसे उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंनी वारंवार पक्षावर टीका केली आहे. वेगळा विचार करू, असा निर्वाणीचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे खडसे-ठाकरे भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.