“अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:36 AM2021-04-06T10:36:09+5:302021-04-06T10:37:40+5:30
anil deshmukh resign: भाजपसह अन्य पक्षांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले.
मुंबई : परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे सीबीआयला आदेश दिले. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत असून, भाजपसह अन्य पक्षांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक ट्विट भाजप नेत्याने केले आहे. (girish mahajan react on anil deshmukh resign)
भाजपचे संकटमोटक नेते म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी एकामागून एक अनेक ट्विट्स करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
मात्र जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे... #MahaVasooliAghadi
— Girish Mahajan (@girishdmahajan) April 6, 2021
ते फक्त हिमनगाचे टोक
निगरगट्ठ ठाकरे सरकारने त्यांची पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. मात्र, जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी ट्विटरवरून केली.
“मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत”
अनिल देशमुख यांचा हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा
राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार, आगे आगे देखो...होता है क्या?, असे सांगत उच्च न्यायालयाने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यामुळे सरकारची नाचक्की होऊन देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागला आहे, असा हल्लाबोल महाजन यांनी केला.
सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाहीये
कोरोनाचे संकट असून देखील राज्यातील या सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाहीये, हे फक्त वसुली सरकार आहे. एका एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती, असेही महाजन यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर आदेश दिले. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित व्यासपीठासमोर मांडाव्यात, असे स्पष्ट केले.