दाऊदच्या अनुयांयाबरोबर गेलात तेव्हाच हिंदुत्व सोडलंत; भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:37 AM2022-10-06T11:37:31+5:302022-10-06T11:43:05+5:30
शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर यावर्षी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. या दोन्ही सभांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
मुंबई: शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर यावर्षी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. या दोन्ही सभांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर टीका केली.आम्ही भाजपला सोडले म्हणजे हिंदत्व सोडले असं होत नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व असं नाही.तुम्ही अगोदर देशातील महागाईवर बोलले पाहिजे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. या टीकेला आज भाजप नेते मंत्री गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले.
"आम्ही अगोदरही सांगितले आहे, भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असं नाही. तुम्ही दाऊदच्या अनुयायांच्या मांडीला मांडी लावून बसलात. काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर तुम्ही गेलात तेव्हाच तुम्ही हिंदुत्व सोडले आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो लावून तुम्ही मत घेतली आहेत. तुम्ही आता भावनिक होऊन लोकांना भुलवू शकत नाही, असं प्रत्युत्तर भाजपचे नेते मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
शिंदे की ठाकरे? कुणाचा मेळावा मोठा, कुठे किती शिवसैनिकांची उपस्थिती, आकडेवारी आली समोर
विधानसभा निवडणुका तुम्ही भाजपसोबत लढलात. निकाल हाती आल्यानंतर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन केले. राज्यातील लोकांना हे पटलेल नव्हत. महाराष्ट्रातील लोक आणि शिवसैनिक आता तुमच्यासोबत राहिलेले नाहीत, असंही मंत्री महाजन म्हणाले.
उद्धव ठाकरेंना १९९९ सालीच मुख्यमंत्री व्हायचे होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे कधी चौकटीतून बाहेर पडले नाहीत. चौकटीतील लोक सूर्य पश्चिमेकडून उगवला सांगायचे आणि हे मानायचे. शिंदेंनी ते केले नाही. शिंदेंनी हिताचे सांगितले, ते मात्र तुम्ही ऐकले नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाच वर्ष पूर्ण करायची होती.त्यामुळे शिवसेनेचे पानीपत होत होते ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत होता, असा गंभीर गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. १९९९ साली जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हाही यांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, असा दावाही शिंदेंनी केला.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा प्रत्येक मुद्द्याचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी बीकेसी मैदानावर अनेक गुपिते उघड केली. त्याचवेळी ठाकरेंवर आरोपांचे बाणही सोडले. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाकरेंनी मला आनंद दिघेंची मालमत्ता किती आणि कुठे आहे, असा सवाल केला. ज्यांचे बँकेत अकाऊंटही नव्हते, त्या दिघेंची मालमत्ता मला विचारली तेव्हा मला धक्का बसला असे सांगून शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्यावर वाटेल ते आरोप करतात. आम्हाला त्याची पर्वा नाही, पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन जे पाप तुम्ही केले आहे, ते शिवसैनिक विसरणार नाही. तुम्ही वैचारिक व्याभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केले आहे, त्यासाठी बाळासाहेबांच्या समाधीवर गुडघे टेकून माफी मागा, अशा शब्दात शिंदेंनी टीका केली.