Maharashtra Politics: “मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचे मीही ऐकतोय”; भाजप नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:26 PM2022-10-22T12:26:25+5:302022-10-22T12:27:10+5:30
Maharashtra News: शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही, असे सूचक विधान भाजप नेत्याने केले आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले. टोकाला गेलेल्या संघर्षात शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. यातच आता उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, आता भाजप नेत्याने केलेल्या एका विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवला. मैदान मारुन काही तास उलटत नाहीत, तोच नार्वेकरांनी थेट भाजपश्रेष्ठींना केलेल्या एका ट्विटची चर्चा रंगली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विट केले असून, यानिमित्ताने पुन्हा एका चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे.
मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचे मी ऐकतोय
मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचे मी ऐकतोय. नार्वेकर यांचे अमित भाईंशी संबंध चांगले आहेत. मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही, असे सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे.
दरम्यान, मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले. त्यावर बोलताना, याकडे राजकारण म्हणून बघण्याचे कारण नाही. पण राजकारणात काहीही शक्य नसते. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. मुंबई महापालिकेत भाजची सत्ता येणार आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र महापालिका लढणार आहे. मात्र मनसेबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"