मनोज जरांगेंना आता माफी नाही; फडणवीसांबद्दलच्या वक्तव्यानंतर महाजनांची आक्रमक भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 05:00 PM2024-02-28T17:00:12+5:302024-02-28T17:22:13+5:30
भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक भूमिका घेत आता जरांगे यांना माफी नाही, असं वक्तव्य केलं आहे.
BJP Girish Mahajan ( Marathi News ) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वादात सापडले आहेत. अशातच भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक भूमिका घेत आता जरांगे यांना माफी नाही, असं वक्तव्य केलं आहे. "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अतिशय संवेदनशील भूमिका घेत महायुती सरकारने मनोज जरांगे यांना मर्यादेच्या पलीकडे जाऊन सहकार्य केलं. समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान केला. मात्र समाजाची ढाल करून त्यांनी स्वतःचा स्वार्थी राजकीय अजेंडा रेटला," असा हल्लाबोल महाजन यांनी केला.
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांना आम्ही खूप सहकार्य केलं. मी स्वत: त्यांच्या उपोषणस्थळी सहा वेळा गेलो. माझ्यासोबत मंत्रिमंडळातील सहकारीही होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रोटोकॉल बाजूला ठेवून दोन वेळा तिथं गेले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल. त्यांनी सांगितल्यानुसार निर्णय घेतले. तरीही मी बोलेन तसंच करा, अशी भूमिका त्यांनी घेतली. छगन भुजबळ यांना ते बोलले, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले, काल-परवा तर जरांगे पाटील यांनी कळस गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीवाचक शिवीगाळ केली, आई-बहिणीवरून बोलले. त्यामुळे त्यांना आता माफी नाही."
दरम्यान, "महाराष्ट्रातील कोणालाच मनोज जरांगे पाटील जे बोलले ते आवडलेलं नाही. मराठा बांधवांनाही ते आवडलेलं नाही. म्हणून जरांगे पाटील यांना आता आपल्या आवाक्यातच बोलावं. तुम्हाला संपवू, तुमच्या पक्षाचा सत्यानाश करू, असं ते म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही एकेरी उल्लेख केला होता. लोकं बघून जरांगे पाटलांच्या डोक्यात हवा गेली होती. मात्र आता लोकांनीही त्यांना खाली उतरवलं आहे. ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेची स्क्रिप्ट वाजवतात," असा घणाघातही गिरीश महाजनांनी केला आहे.