इंजिनाची दिशा बदलणार?; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 05:51 PM2020-01-23T17:51:05+5:302020-01-23T17:52:36+5:30

थोड्याच वेळात राज ठाकरे महाअधिवेशनाला संबोधित करणार

bjp leader gives indication about alliance with raj thackeray led mns | इंजिनाची दिशा बदलणार?; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत

इंजिनाची दिशा बदलणार?; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत

googlenewsNext

मुंबई: मनसेनं त्यांच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात नव्या झेंड्याचं अनावरण केलं. यानंतर आता भाजपानंमनसेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र पक्षाची भूमिका राज ठाकरेच जाहीर करतील, हे मनसे नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे थोड्याच वेळात होणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मनसेची आगामी भूमिका काय असणार, पक्ष भाजपासोबत जाणार का, या प्रश्नांची उत्तरं राज यांच्या भाषणातून मिळण्याची शक्यता आहे. 

तत्पूर्वी मनसेकडून आज सकाळी नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. याआधी मनसेच्या झेंड्यात तीन रंग होते. मात्र आता मनसेच्या झेंड्यात केवळ भगवा रंग आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराजाचं प्रतीक असलेली राजमुद्रादेखील झेंड्यावर आहे. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेनं विचारधारा बदलल्यास एकत्र येऊ, असे संकेत भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुनगंटीवार यांनी मनसेबद्दल भाष्य करताना महाविकास आघाडी सरकारचा संदर्भ दिला. ते सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. तर मग आम्ही सत्यासाठी सोबत का येऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेच्या नव्या भूमिकेचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी भाजपा-मनसे युतीचे संकेतदेखील दिले. मात्र यावर मनसेनं सावध भूमिका घेतली. राज ठाकरे थोड्याच वेळात मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. यावेळी ते पक्षाची भूमिका मांडतील, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन होत असून थोड्याच वेळात राज ठाकरे या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. 
 

Web Title: bjp leader gives indication about alliance with raj thackeray led mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.