OBC Reservation : मुख्यमंत्री हतबल झालेत की प्रस्थापितांपुढे नांगी टाकली हे त्यांनी सांगावं - गोपीचंद पडळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:19 PM2021-09-22T12:19:28+5:302021-09-22T12:20:30+5:30
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट. भेटीनंतर ओबीसी आरक्षणावर स्पष्ट केली भूमिका.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर पडळकर यांनी ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. या प्रस्थापितांच्या सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं नाही हे राज्यपालांकडे पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध होत असल्याचं ते म्हणाले.
"माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा जो मूळ प्रस्ताव आहे यात विधी व न्याय खात्यानं स्पष्टपणे नमूद केलंय की अध्यादेश काढण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे. या सर्व खात्यांचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना हेच विचारायचं आहे की त्यांना त्यांच्या शासनामध्ये काय घडतंय याचा सुगावा नसतो का? या सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधायला त्यांना वेळ नसतो का? किरीट सोमय्यांना अटक केली हेदेखील त्यांना माहित नसतं," असं पडळकर म्हणाले.
OBC Reservation : मुख्यमंत्री हतबल झालेत की प्रस्थापितांपुढे नांगी टाकली हे त्यांनी सांगावं - गोपीचंद पडळकर#gopichandpadalkar#uddhavThackeraypic.twitter.com/iwpMX2Dt5x
— Lokmat (@MiLOKMAT) September 22, 2021
"समस्त ओबीसींचा जो विषय आहे तो राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढला यातही त्रुटी आहेत हेदेखील यांना माहित नसतं. यांच्याच विभागानं यात नकारात्मक भूमिका घेतली. यावर कोणताही उपाय न करता त्यांनी राज्यपालांकडे प्रस्ताव कशासाठी पाठवला? मुख्यमंत्री हतबल आहेत की प्रस्थापितांच्यापुढे त्यांनी नांगी टाकलीये हे त्यांनी महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजनांना सांगावं अशी मी विनंती करत आहे," असंही ते म्हणाले.