'जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?', गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:56 PM2021-09-27T12:56:00+5:302021-09-27T12:58:16+5:30
'उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले.'
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून एमआयएम प्रमुख औवेसी भाजपचे अंगवस्त्र असल्याची टीका करण्यात आली आहे. त्यावर भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना खोचक प्रत्युत्त दिलं आहे. उद्धव सेनेचे 56 आमदार युतीच्या जीवावरच निवडून आले, हे जनाब संजय राऊत विसरले असतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
गोव्यात काँग्रेसला खिंडार? लवकरच माजी मुख्यमंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश
माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले की, 'राज्यात उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले. कदाचित हे जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपचे अंगवस्त्र म्हणून केली, पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावात इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. अमरावती मनपातही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है? हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही', अशी टीका पडळकर यांनी केली.
भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये
पडळकर पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर कारवाई करण्याची तुमच्यात हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. महाविकासआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी कोलांट्या उड्या मारता. महाराष्ट्रातील जनतेला या खेळाचा किळस आलाय', असंही ते म्हणाले.