MPSC Exam: २१ ला परीक्षा न झाल्यास वर्षासमोर उपोषण; गोपीचंद पडळकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:48 PM2021-03-12T12:48:01+5:302021-03-12T12:50:51+5:30
MPSC exam - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता २१ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे.
पुणे: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC exam) गुरुवारी रद्द केल्याची घोषणा केल्यावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता २१ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, २१ तारखेला परीक्षा झाली नाही, तर वर्षासमोर उपोषण करणार, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिला आहे. (bjp leader gopichand padalkar warned thackeray government over mpsc exam issue)
परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी सरकारने तरतूद करावी. त्यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच नवीन जाहीर केलेल्या तारखेला म्हणजेच २१ मार्च रोजी परीक्षा झाली नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.
MPSC परीक्षा 21 मार्चला होणार; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश
हे सरकार बेजबाबदार
मुख्यमंत्र्यांवर कोण दबाव टाकतंय? काल तारीख का जाहीर केली नाही? सरकारमधील इतर मंत्री दबाव टाकत आहेत का?, असे काही सवाल उपस्थित करत हे सरकार अतिशय बेजबाबदार असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तारीख जाहीर केली नाही, म्हणून आंदोलन सुरू ठेवले. पण पोलिसांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपले, असा आरोप पडळकर यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, एमपीएससीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे राज्याच्या पुनर्वसन विभागाने कळविल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. गेल्या वर्षभरापासून ही परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभर निदर्शने केली.