"रिक्षावाला घाम गाळतो, कुठलाही व्यवसाय नसताना आदित्य ठाकरेंच्या नावे कोट्यवधीची संपत्ती"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:51 AM2023-04-04T10:51:22+5:302023-04-04T10:53:29+5:30
याआधीही या गटाचे संजय राऊत, आदित्य ठाकरे व स्वतः उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांच्यासह सर्व बंडखोरांना त्यांच्या व्यावसायिक स्तरावरून हिणविले आहे असं भाजपानं म्हटलं.
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीत दिग्गज नेते आहेत, ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं विधान करून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत चांगलेच अडचणीत आले आहेत. महाविकास आघाडी सरकार बनवताना मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली होती. त्यात शरद पवारांनी असं विचारल्याने उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली असा दावा अरविंद सावंत यांनी केला. मात्र पवारांनी रिक्षावाला शब्दच वापरला नाही असं राष्ट्रवादीने सांगताच सावंत यांनी यू-टर्न घेत तो शब्द आमची भाषा आहे. शरद पवार बोलले नाहीत अशी सारवासारव केली. मात्र आता यावरून भाजपाने ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात ‘रिक्षावाला’ हा व्यावसायिकतेचा उपरोध करणारा शब्द शरद पवार यांनी वापरला नसून तो आपण वापरला अशी कबुली अरविंद सावंतांनी दिली. ठाकरे गटाचे शिल्लक खासदार सावंत यांनी आपल्यावरील राजकीय संस्काराचे दर्शन घडविले आहे. हा शिंदे यांचा अपमान तर आहेच, पण उदरनिर्वाहासाठी घाम गाळणाऱ्या रिक्षाचालतांच्या व्यवसायाचाही अपमान आहे. या देशात आणि जगात सर्वत्र श्रमाला प्रतिष्ठा आहे, याचे संस्कार सावंत यांना राजकीय उंचीवर नेऊन बसविणाऱ्या ठाकरे सेनेतही नाहीत याचा हा आणखी एक पुरावा आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच याआधीही या गटाचे संजय राऊत, आदित्य ठाकरे व स्वतः उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांच्यासह सर्व बंडखोरांना त्यांच्या व्यावसायिक स्तरावरून हिणविले आहे. ठाकरे कुटुंब हेच या सर्वांचे उद्धारकर्ते आहेत आणि या कुटुंबाच्या उपकारांमुळेच हे नेते मोठे झाले अशा आशयाची दर्पेक्ती करताना, या नेत्यांनी आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले कष्ट आणि खाल्लेल्या खस्ता यांचा ठाकरे कुटुंबास कृतघ्न विसर पडला. मुख्यमंत्री शिंदे यांना शरद पवार यांच्या नावाआडून रिक्षावाला असे हिणविणाऱ्या सावंतांनी याच संस्कृतीचा कित्ता गिरविला आहे असा टोला केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाला लगावला.
दरम्यान, व्यावसायिक प्रतिष्ठा पाहूनच कोणी कोणाच्या हाताखाली काम करायचे हा निकष महाविकास आघाडीच्या नेतानिवडीत असेल, तर आदित्य ठाकरे यांच्या हाताखाली काम करण्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील ते दिग्गज तयार झाले असते का? कारण, व्यवसायाचा नेमका तपशील जाहीर नसतानाही कोट्यवधीची मालमत्ता आदित्य ठाकरेंच्या नावावर जमा होती. अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिणविल्यामुळे श्रीमंती आणि धनसत्ता हे नेतृत्वगुणाचे लक्षण मानणारी ठाकरे गटाची मानसिकता स्पष्ट झाली आहे. व्यवसायावरून सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर ठरविणाऱ्या या मानसिकतेचा निषेध व्हायलाच हवा असंही भाजपानं म्हटलं आहे.