“… खैरेंचे वक्तव्य म्हणजे राऊतांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतःचे महत्व वाढविण्याचा विनोदी प्रयत्न”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 08:02 PM2022-09-05T20:02:06+5:302022-09-05T20:02:38+5:30
भाजपचा जोरदार निशाणा. आपण त्या बैठकीला उपस्थित असून प्रत्येक पक्षाला त्यात अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलं होतं, असं खैरे म्हणाले.
सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यानंतर चंद्रकांत खैरे यांनीदेखील अमित शाह यांच्यावर टीकेचा बाण सोडला. “मी त्या बैठकीला शिवसेना नेता म्हणून उपस्थित होतो. उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना बोलावलं होतं. एकेका पक्षाला अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद असं त्यात ठरलं होतं. इतकं झाल्यानंतर अमित शाह उद्धव ठाकरेंना असं म्हणत असतील तर चिड येणारी बाब आहे,” असं खैरे म्हणाले. यावरून आता भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांना टोला लगावला आहे.
“उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना नेता म्हणून मी हजर होतो. हे चंद्रकांत खैरेंचे वक्तव्य म्हणजे संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतःचे महत्व वाढविण्याचा विनोदी प्रयत्न आहे,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी खैरेंना टोला लगावला.
'बरळूंची कमतरता'
तसेही आता शिल्लक सेनेत बरळूंची कमतरता भासत असल्याने आपल्याला मातोश्रीची मर्जी संपादन करता येईल असा खैरे यांचा गनिमी कावा असावा. त्यासाठीच ते आवाक्याबाहेरची मुक्ताफळे उधळू लागले आहेत. शिल्लक सेनेच्या प्रमुखांचा आणि, पेंग्विनसेनेच्या बाल नेत्यांचा वाढदिवस किंवा तथाकथित गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पायावर डोके ठेवण्यापलीकडे ज्यांना कधीही मातोश्रीच्या उंबरठ्यातून आत प्रवेशदेखील मिळाला नाही. अशा दुय्यम नेत्याने अमित शाहंसोबतच्या बैठकीला आपण हजर होतो असे कितीही ओरडून सांगितले तरी पेंग्विनसेनेचा कार्यकर्ताही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नसल्याचे ते म्हणाले.
'पटतील अशा थापा मारा'
“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. आपल्या पोरकट महत्वाकांक्षेपोटी आणि मातोश्रीवर शिरकाव मिळावा यासाठी आमच्या नेत्यावर टीका करून स्वतःचे हसे करून घेण्यापूर्वी खैरे यांनी शिल्लकसेनेच्या प्रमुखांची परवानगी घेतली का हा आमचा सवाल आहे. उद्धव ठाकरेंचा धडधडीत खोटेपणा अमित शाह यांनी उघड केल्यामुळे लपून राहिलेल्या पेंग्विनसेनेतील राऊतांची जागा घेण्यासाठी खैरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तरी पटतील अशा थापा माराव्यात,” असे म्हणत उपाध्ये यांनी खैरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.