हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना - सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:00 PM2021-09-20T12:00:45+5:302021-09-20T12:02:25+5:30
कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी का दिली गेली. हे शरद पवारांना जास्त माहीत आहे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
सातारा - भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या(kirit somaiya) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप केला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत, 'हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही, तर मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अशी सूचना आपल्याला खुद्द देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते कराड पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून रोखल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. (BJP leader kirit somaiya attacks on ncp leader hasan mushrif in karad)
'मुख्यमंत्री अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार'
सोमय्या म्हणाले, 'हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ आणि परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. एवढेच नाही, तर 2020 मध्ये कुठल्याही पारदर्शतेशिवाय हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनी ही बेनामी कंपनी आहे. हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीचीही चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे, असेही सोमय्या म्हणाले.
Kirit Somaiyya : हसन मुश्रिफांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की गुंड?
कोलकात्याच्या शेल कंपन्यांच्या नावाने पैसे उभारले गेल्याचा आरोप करत, या घोटाळ्यासंदर्भात आपण ईडीकडे कागदपत्रे देऊन उद्या तक्रार करणार आहोत,' असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर कारखान्यातील ९८ टक्के शेअर्स हे एका बैनामी कंपनीचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी का दिली गेली. हे शरद पवारांना जास्त माहीत आहे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. याच वेळी, आपण पुढच्या आठवड्या पुन्हा भेटणार आहोत आणि हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.