“उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी घोटाळामुक्त महाराष्ट्र करुन दाखवणार”: किरीट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 04:19 PM2022-02-20T16:19:55+5:302022-02-20T16:22:14+5:30

मराठीत उपलब्ध असलेल्या शिव्या सगळ्या एकदाच देऊन टाका, असा पलटवार किरीट सोमय्यांनी केला.

bjp leader kirit somaiya replied uddhav thackeray and sanjay raut over allegations | “उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी घोटाळामुक्त महाराष्ट्र करुन दाखवणार”: किरीट सोमय्या

“उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी घोटाळामुक्त महाराष्ट्र करुन दाखवणार”: किरीट सोमय्या

Next

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मालमत्तेची पाहणी करायला गेल्याने भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना सांताक्रूझ पोलिसांनी नोटीस बजावली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे किरीट सोमय्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हजारवेळा तुरुंगात टाकले, तरी महाराष्ट्र घोटाळामुक्त करून दाखवणार असल्याचे प्रत्युत्तर किरीट सोमय्यांनी दिले. 

पोलीस स्थानकांत हजेरी लावल्यानंतर ते मीडियाशी बोलत होते. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काढलेल्या अपशब्दाबाबत किरीट सोमय्या यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा, मराठीत कोणती डिक्शनरी आहे का ते बघा आणि जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत, तेवढ्या एकदाच मला देऊन टाका. मराठीत उपलब्ध असलेल्या शिव्या सगळ्या एकदाच देऊन टाका, रोज माझ्या आईला संताप नको, असा पलटवार किरीट सोमय्या यांनी केला. 

बेनामी संपत्ती दाखवली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल

किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याला तुरुंगात टाकू, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. संजय राऊत आणि त्यांचा पार्टनर सुजीत पाटकरविरोधात गुन्हा दाखल होत नाही, परंतु १०० कोटींची बेनामी संपत्ती मीडियाला दाखवली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो, या शब्दांत किरीट सोमय्या यांनी संताप व्यक्त केला. साडेचौदा लाख ८५ हजार २१४ कोटी रुपये लाटल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात उत्तर देणार, असे सोमय्यांनी स्पष्ट केले. 

घोटाळामुक्त महाराष्ट्र करून दाखवणार

मला, माझ्या आईवडिलांना किंवा माझ्या कुटुंबाला सगळे शिवीगाळ करत असतात. त्यांच्याबद्दल अपशब्द बोलताहेत, यावेळी उद्धव ठाकरे काय करतायत, अशी विचारणा करत, शिवीगाळ सोडा, उद्धव ठाकरेंनी हजारवेळा जरी तुरुंगात टाकले तरी मी घोटाळामुक्त महाराष्ट्र करून दाखवणार, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, किरीट सोमय्यांवर टीका करताना पुन्हा एकदा संजय राऊत यांनी अपशब्द काढले. देशाच्या राजकारणात बदल घडत आहेत. वर्ष २०२४ नंतर देशात स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. त्यामुळे सोमय्यासारखी लोकं राजकारणातून संपतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत असे वक्तव्य करणे हा राज्याचा अपमान आहे. राज्यातील नागरिकांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्याला केंद्र सरकार सुरक्षा देते, या शब्दांत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्लाबोल केला.
 

Web Title: bjp leader kirit somaiya replied uddhav thackeray and sanjay raut over allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.