गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा समजेना; राऊतांनी सांगितलं नेमकं 'लोकेशन'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:21 AM2022-04-12T11:21:29+5:302022-04-12T11:24:01+5:30
भाजप नेते किरीट सोमय्यांचा ठावठिकाणा गृह मंत्रालयाला समजेना; पोलिसांकडून शोध सुरू
मुंबई: आयएनएस विक्रांत संवर्धन निधी संकलन प्रकरणात सत्र न्यायालयानं भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे सोमय्या पिता पुत्रांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. मात्र सोमय्यांचा ठावठिकाणा राज्याच्या गृह विभागाला माहीत नाही. तशी माहिती गृह विभागानं स्वत:चं दिली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा ठावठिकाणा माहिती नाही. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे नेमके कुठे गेले, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती गृह विभागाकडे नाही. सध्या पोलीस सोमय्या पिता पुत्रांचा शोध घेत आहेत.
As per Maharashtra Home department, BJP leader Kirit Somaiya and his son Neil have been untraceable after a case was registered against them, in connection with alleged misappropriation of funds collected to save aircraft carrier INS Vikrant from scrapping
— ANI (@ANI) April 12, 2022
सोमय्या गुजरात किंवा गोव्यात- राऊत
एकीकडे गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा माहीत नसताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांचं लोकेशन सांगितलं आहे. गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या हे लपून बसल्याचा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
‘आयएनएस विक्रांत’ बचाव मोहिमेच्या नावाखाली सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असून देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयातही घोटाळे करणाऱ्या सोमय्या यांना दिलेली सुरक्षा केंद्र सरकारने तातडीने काढायला हवी. अशा माणसाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दिली आहे, ही दुर्दैवी बाब आहे.
केंद्राकडे विचारणा करू- वळसे पाटील
केंद्रानं सोमय्यांना सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षा दिलेली व्यक्ती कुठे आहे याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाला विचारणा करू, असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. दुसऱ्यांवर आरोप करणं सोपं असतं. मात्र स्वत:वर आरोप झाले की पळून जायचं हे काही शूरपणाचं लक्षण नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला.