"उद्धव ठाकरे सरकारचे काऊंट डाऊन सुरू", किरीट सोमय्यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:28 AM2022-06-21T11:28:51+5:302022-06-21T12:20:44+5:30
Kirit Somaiya On Shiv Sena : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत मोठा दावा केला आहे. सोमय्या यांच्या ट्विटवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपाने दिलेल्या जबर धक्क्यातून महाविकास आघाडी सरकार सावरण्यापूर्वीच शिवसेनेतील वजनदार नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत मोठा दावा केला आहे. सोमय्या यांच्या ट्विटवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे मोठा दावा केला असून, उद्धव ठाकरेंचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असे ते म्हणाले. किरीट सोमय्या म्हणाले, महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला (माफिया सेना) 52 मते मिळाली आहेत. 12 आमदारांचे बंड (55 शिवसेना + 9 समर्थक = 64) उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे.
Maharashtra VidhanParishad Election Results
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 21, 2022
Shiv Sena (Mafia Sena) got 52 votes.
12 MLA's Revolted (55 Shiv Sena + 9 supporters = 64)
Uddhav Thackeray's Mafia Sarkar's Count Down started. @BJP4India
दरम्यान, काल विधान परिषद निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक असलेले अनेक आमदार नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेची झोप उडाली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा भाजपच्या एका नेत्यासोबत बैठक घेतली असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेनेच्या नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये शहाजीबापू पाटील, महेश शिंदे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, संजय राठोड, प्रताप सरनाईक, संजय सिरसाट, रमेश बोरनारे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर, संजय रायमुलकर आणि प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्य करून असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.