हे खासदार आहेत ते माझंच पाप, नारायण राणेंचा संजय राऊतांवर टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 10:21 AM2023-01-15T10:21:33+5:302023-01-15T10:22:01+5:30
पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी काय केलं? राणेंचा सवाल
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून काय केलं? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गेलात? शिवसेना कुठे घेऊन गेलात? कोणत्या शाखेचं उद्घाटन केलं? महाराष्ट्रातील कोणत्या सैनिकाचं दु:ख पुसलं, कोणाला घर दिलं नोकरी दिली? उपासमारीच्या वेळी अन्न दिलं. उद्धव ठाकरेंनी एक तरी उदाहरण द्यावं,” असं म्हणत नारायण राणे यांनी टीकेचा बाण सोडला.
“संपादक म्हणून चांगलं लिहा. हे खासदार आहेत ते माझं पाप आहे. बाळासाहेंबांनी त्यावेळी मला बोलावलं होतं. मी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यावेळी ते तिकडे बसले होते. संजय राऊतांना खासदार बनवायचंय, उद्या फॉर्म भरायचाय, त्याला घेऊन जा आणि खासदार कर असं बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं. त्यांच्यासमोर मी कधी नाही म्हटलं नाही. दुसऱ्या दिवशी मी विधानभवनात कागदपत्रं घेऊन बोलावलं होतं,” असा दावाही राणेंनी केला.
“बोलायला लावू नका”
“शिवसेनेची काय अवस्था झालीये. ४० आमदार दिवसाढवळ्या एकनाथ शिंदेंसोबत जातात आणि शिवसैनिक उघड्या डोळ्यांनी पाहतात. उद्धव ठाकरे रडले की हे रडतात. रडणारी शिवसेना कधीच नव्हती, लढणारी शिवसेना होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही सांगायचो. आता कुठे आहे सळसळतं रक्त,” असं म्हणत नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
“हे दुसऱ्यांना खोके म्हणतात. तुम्ही नाही का घेतले खोके? आम्ही काय मातोश्रीवर गुच्छ घेऊन जायचो का मातोश्रीवर? उद्धव ठाकरे सांगतील त्या दिवशी आम्ही काय काय आणि कोणत्या कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे सांगेन. आम्हाला बोलायला लावू नका, वयाच्या १५ व्या वर्षापासून मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांसाठी आम्ही वेडे होतो. त्यांनी प्रेमही दिलं आणि विश्वासही दिला. त्यामुळे आम्ही त्यागाला तयार होतो. जीवाची पर्वा केली नाही. संपादकाचाही पगार घ्यायचा आणि नेता म्हणूनही तोडबाजी करायची असं नाही,” असं म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला.