"स्थानिक आमदार सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांनाही हरवून दाखवेन"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 05:34 PM2022-10-14T17:34:19+5:302022-10-14T17:35:10+5:30

"तीन जणांना विधान परिषद दिली, तेव्हा आदित्य ठाकरे वरळीतून आमदार झाले", असा टोलाही आमदाराने लगावला

BJP leader MLA Mahesh Baldi gives open challenge to Uddhav Thackeray also trolls Shivsena Aditya Thackeray | "स्थानिक आमदार सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांनाही हरवून दाखवेन"

"स्थानिक आमदार सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांनाही हरवून दाखवेन"

googlenewsNext

Uddhav Thackeray vs BJP: महाराष्ट्रात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीनंतर मुंबई महापालिका निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे गट विरूद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान, उरणचे आमदार आणि भाजपा नेते महेश बालदी यांनी थेट उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिले आहे. २०१९ साली शिवसेना-भाजपा युती असल्याने महेश बालदी यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. मात्र ते बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आले होते. याच महेश बालदींनी उरणमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंना 'ओपन चॅलेंज' दिलं आहे. 

काय म्हणाले महेश बालदी?

"पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा प्रकार थांबवण्यात यायला हवा. विरोधक जात, धर्म, पंथाची भाषा तेव्हाच करतात जेव्हा त्यांच्यातील कर्तृत्व संपते. माझ्यावरही आरोप झाले की मी मराठी नाहीये.. बाहेरून आलेला आहे. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. माझी एकच इच्छा आहे की महाविकास आघाडीचा मिळून एक उमेदवार यावेळी माझ्यासमोर उभा राहायला हवा. या सगळ्यांना एकदाच हरवून टाकलं की हे लोक गप्प बसतील. उद्धव ठाकरे गेल्या वेळी प्रचाराला दोनदा उरणमध्ये आले, आदित्य एकदा आले, पण मी हरलो नाही. गेल्या वेळी मी अपक्ष होतो. पण यंदा माझ्याबरोबर कमळ असेल, मोदी असतील, अमित शाह असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यामुळे मला कसलीच चिंता नाही. स्थानिक आमदार मनोहर भोईर तर सोडाच, खुद्द उद्धव ठाकरे जरी इथून उभे राहिले तरी त्यांनाही हरवेन", अशा शब्दांत महेश बालदी यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं.

"तुम्ही तुमच्या मुलाला वरळी विधानसभेतून उभे केलं, तेव्हा तीन उमेदवारांना विधान परिषदेची उमेदवारी दिलीत, तेव्हा कुठे तुमचा मुलगा आमदार झाला. आम्ही मात्र छातीला माती लागली तरीही मागे न फिरणारे भाजपाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही त्यानुसार कायम करत राहणार. गेल्या काही काळात आदिवासी पाड्यातील लोकांच्या काही मागण्या, गरजा पूर्ण करण्यात जर अपयशी ठरलो असेन, तर यावेळी असं होणार नाही. भाजपाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सर्व प्रश्न सोडवू," असा शब्द महेश बालदी यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक, लोधिवली, आसरे व तुपगाव सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी भाजपाप्रणित परिवर्तन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेत त्यांनी आपले विचार मांडले.

Web Title: BJP leader MLA Mahesh Baldi gives open challenge to Uddhav Thackeray also trolls Shivsena Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.