“महाभारतात धृतराष्ट्रला डोळे नव्हते, पण महाराष्ट्रातील धृतराष्ट्र आपल्या डोळ्याने सर्वनाश पाहतायत”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 09:57 PM2022-06-28T21:57:16+5:302022-06-28T21:58:34+5:30
राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. एकीकडे सत्ता संघर्ष पराकोटीला जात असताना दुसरीकडे भाजपच्या बैठकांचे सत्र सुरू झाले असून, मंगळवारी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या. यानंतर आता भाजप नेत्याने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मोहित कंबोज हे एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांसोबत प्रथम सूरतमधील हॉटेलमध्ये दिसले होते. त्यानंतर ते बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला जाताना सूरत विमानतळावरही दिसले होते. त्यांच्यासोबत अन्य भाजप नेतेही होते.
महाराष्ट्रातील धृतराष्ट्र आपल्या डोळ्याने सर्वनाश पाहतायत
मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाभारतात धृतराष्ट्र नेत्रहीन होते. संजयला मिळालेल्या दिव्य दृष्टिने त्यांनी आपला सर्वनाश होताना पाहिला. मात्र, महाराष्ट्रातील धृतराष्ट्राला डोळे आहेत. संजय सर्वनाश करत आहेत आणि ते पाहात बसले आहेत, या शब्दांत मोहित कंबोज यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, भाजपच्या बैठकींचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भेट घेतली. गेल्या काही दिवसांत अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केली आहे. त्यामुळे भाजपही राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती.