"संजय राऊतांना सत्तेचा माज, त्यांनी अपक्षां आमदारांचा अपमान केला", अनिल बोंडेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 01:26 PM2022-06-12T13:26:09+5:302022-06-12T13:26:46+5:30
Anil Bond slams Sanjay Raut: नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी घोडेबाजार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई- नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. यात महाराष्ट्रातील सहापैकी तीन जागांवर भाजपचा विजय झाला, तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली. दरम्यान, शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात झालेल्या थेट सामन्यात भाजपचा विजय झाला. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही अपक्ष आमदारांची नावे सांगत भाजपला मतदान केल्याचा आरोप केला. यावर भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bond) यांनी जोरदार टीका केली.
'संजय राऊतांना सत्तेचा माज'
राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनिल बोंडे नागपूरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना बोंडे म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनता आता महाविकास आघाडीला वैतागली आहे. महाविकास आघाडीतील आणि अपक्ष आमदारही त्यांना वैतागले आहेत. संजय राऊत यांना तर सत्तेचा माज आलाय, ते द्वेषाने पेटलेले आहेत, म्हणूनच त्यांनी अपक्ष आमदारांचा अपमान केला. अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा आरोप करून बदनामी करण्याचा गाढवपणा त्यांनी केला," अशी बोचरी टीका बोंडे यांनी केली आहे.
'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत...'
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीतल्या आमदारांकडून त्यांचे मंत्री कमिशन घेतात तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? पक्षातील आमदारांनाच त्यांचे मंत्री, मुख्यमंत्री भेटत नाहीत. महाराष्ट्रातील जनता सरकाला वैतागली आहे. यांच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत आहे. सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळाचीच आठवण येत आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असंही बोंडे म्हणाले.